Join us

मुंबईत अटलजींचे स्मारक उभारण्यात येणार - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 5:44 AM

राज्य सरकारच्या वतीने मुंबईत अटलजींचे स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे देशाच्या मातीशी जोडलेले नेते होते. या देशाला काय हवे आहे, देशाचे भावनिक ऐक्य कशात आहे, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळेच आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवून त्यांनी खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाची भूमिका स्वीकारली, असे सांगत, राज्य सरकारच्या वतीने मुंबईत अटलजींचे स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.नरिमन पॉइंट येथील एनसीपीए सभागृहात अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्य सरकारातील मंत्री, भाजपा पदाधिकारी, नेते आणि राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.मृत्यूला आव्हान देणारा माणूस अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाजपेयी यांचे वर्णन केले. मृत्यूवर मात करून जीवन जगणारा हा नेता होता. अटलजींनी आपल्याला ध्येयवाद शिकविला. विचार हे कागदावर नसतात, तर आचरणासाठी असतात, याचा वस्तुपाठच त्यांनी आपल्यासमोर घालून दिला. भारताला २१व्या शतकात नेण्याचे काम अटलजींच्या सरकारने केले. ते अर्थशास्त्री नव्हते. मात्र, त्यांची नाळ मातीशी जोडलेली होती. त्यामुळेच देशाच्या विकासाला वळण देणाºया प्रभावशाली योजना त्यांच्या काळात सुरू झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.अटलजींच्या निधनाने राजकारणातील महानायक काळाच्या पडद्याआड गेला आहे. अशी माणसे युगायुगात जन्मास येत असतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. पत्रकार, लेखक, कवी, समाजकारणी, तत्त्वचिंतक, वाक्पटू अशा विविध रूपांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व घडलेले होते. त्यांच्या जाण्याने युगान्त झाला आहे, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी श्रद्धांजली वाहिली.भाजपातर्फे राज्यातील विविध नद्यांमध्ये वाजपेयी यांच्या अस्थिंचे विसर्जन केले जाईल. त्यासाठी अस्थीकलश भाजपा जिल्हाध्यक्षांकडे देण्यात आले. तत्पूर्वी नवी दिल्ली येथून हे अस्थीकलश आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

टॅग्स :अटलबिहारी वाजपेयीदेवेंद्र फडणवीसभाजपा