Join us

मुंबईत भव्य ईस्ट इंडियन भवन बांधा, आ. अमित साटम यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 1:14 PM

ईस्ट इंडियन कम्युनिटीचे मुंबई शहराच्या विकासात मोठे योगदान आहे.

मनोहर कुंभेजकर

मुंबई - मुंबईचे आगरी, कोळी हे जसे आद्य नागरिक आहेत, त्याच प्रमाणे ईस्ट इंडियन कम्युनिटी देखील मुंबईचे आद्य नागरिक आहेत. त्यांचे या मुंबई शहरात शेकडो वर्षे वास्तव्य आहे. ईस्ट इंडियन कम्युनिटीचे मुंबई शहराच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यांनी आपल्या जागा मुंबईच्या विकासासाठी दिल्या आहेत. त्यांचे हेरिटेज कल्चर, संस्कृती, रूढी, परंपरा टिकणे गरजे असून यासाठी ईस्ट इंडियन भवनाची गरज आहे.

मुंबईतील 40 कोळीवाड्यांचे सीमांकन होणार आहे. मुंबई महानगर पालिकेच्या नव्या विकास आराखड्यात ईस्ट इंडियन कम्युनिटी भवनासाठी मुंबईतील कलेक्टर जमिनीवर खास जागा आरक्षित करावी. या जागेवर समाज बांधवांसाठी मुंबईत भव्य ईस्ट इंडियन कम्युनिटी भवन उभारावे अशी आग्रही मागणी आपण शासनाला केली असल्याची माहिती अंधेरी पश्चिम विधानसभेचे  भाजपा आमदार अमित साटम यांनी लोकमतशी बोलताना केली.

शुक्रवारी ( 20 जुलै ) नागपूर येथील पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर आज सकाळी अंधेरी पश्चिम लल्लूभाई पार्क येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली असता ईस्ट इंडियन कम्युनिटी भवन बांधण्याची आपण शासनाला आग्रही मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या बरोबर हिरीरीने काम करणारे काका बाप्टीसा यांचे नाव या भवनाला देण्यात यावे अशी आग्रही मागणी विधानसभेत  केली असल्याचेही ते म्हणाले. लवकरच या भवनाच्या मागणीसाठी आपण ईस्ट इंडियन कम्युनिटीच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबई