सागरी वारसास्थळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे दालन तयार करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:06 AM2021-07-11T04:06:37+5:302021-07-11T04:06:37+5:30
मुंबई : हडप्पा संस्कृतीच्या काळापासून जलमार्गे होणाऱ्या व्यापाराचे मुख्य केंद्र असलेल्या लोथलचा विकास ‘सागरी वारसा स्थळ’ म्हणून केला जाणार ...
मुंबई : हडप्पा संस्कृतीच्या काळापासून जलमार्गे होणाऱ्या व्यापाराचे मुख्य केंद्र असलेल्या लोथलचा विकास ‘सागरी वारसा स्थळ’ म्हणून केला जाणार आहे. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने विशेष दालन तयार करण्याची मागणी राज्यातील आघाडीच्या नाविक संघटनांनी केली आहे.
या परिसरात सागरी क्षेत्राशी संबंधित वस्तुसंग्रहालय तयार केले जाणार आहे. शिवाय मरिटाइम थीमपार्क, सागरी संशोधन केंद्र, निसर्ग संवर्धन उद्यान आणि पंचतारांकित सुविधा असलेले हॉटेल उभारले जाणार आहे. येथे भेटी देणाऱ्या देशविदेशातील नाविकांसह पर्यटकांना भारताच्या समुद्रीशक्तीचा परिचय व्हावा, या उद्देशाने हेरिटेज कॉम्प्लेक्सची रचना केली जाणार आहे. इसवीसन पूर्व ते आधुनिक भारतापर्यंतच्या इतिहासात सागरात घडलेल्या घटनांचा दस्तऐवज येथे उपलब्ध करून दिला जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने येथे विशेष दालन तयार करण्यात यावे, अशी मागणी ऑल इंडिया सीफेरर्स युनियनचे अध्यक्ष संजय पवार यांनी नवनिर्वाचित नौकानयन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नाविक क्षेत्राचे जनक असे संबोधले जाते. त्यांनी आपल्या आरमाराच्या जोरावर फिरंगी, इंग्रज, डच यांसह समुद्री चाच्यांना रोखून धरले किंबहुना त्यांच्यावर हुकूमत गाजवली. त्यामुळे शिवरायांच्या पराक्रमी गाथा सांगणारे विशेष दालन सागरी वारसा स्थळात तयार करावे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या मागणीचा पाठपुरावा सातत्यपूर्ण केला जाईल, असे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
नेमकी योजना काय आहे?
केंद्रीय नौकानयन मंत्रालयाने अलीकडेच सांस्कृतिक मंत्रालयाशी सामंजस्य करार करून जागतिक वारसास्थळ असलेल्या लोथलमध्ये मेरीटाइम हेरिटेज कॉम्प्लेक्स उभारण्याची योजना आखली आहे. त्यासाठी दोन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. देशविदेशातील नाविकांसाठी अनेक सुखसोयी येथे तयार केल्या जातील.