घरे लवकर विका आणि आर्थिक संकटाची धार कमी करा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 07:04 PM2020-04-13T19:04:32+5:302020-04-13T19:05:07+5:30
एसबीआयच्या अध्यक्षांचा बांधकाम व्यावसायीकांना सल्ला
मुंबई - कोरोनामुळे बांधकाम व्यवसायावर कोसळलेल्या आर्थिक संकटाची धार कमी करायची असेल तर विकासकांना आपल्या परंपरागत कार्यपध्दतीत बदल करावा लागेल. पाच वर्षांत घरांच्या किंमती दुप्पट होण्याचे दिवस आता सरले आहेत. त्यामुळे जी घरे बांधून पूर्ण झाली आहेत ती लवकरात लवकर विका आणि भविष्यात परवडणा-या घरांच्या उभारणीवर भर द्या असा सल्ला स्टेट बँक आॅफ इंडियाचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी देशातील बांधकाम व्यावसायीकांना दिला आहे.
देशातील बांधकाम व्यावसायीकांची संघटना असलेल्या नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलने (नरडोको) वेबिनारच्या माध्यमातून एसबीआयच्या अध्यक्षांशी संवाद साधला. त्यावेळी रजनीश कुमार यांनी भविष्यातील आर्थिक संकटांचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांचा उहापोह केला. पुर्वी घरांच्या किंमती पाच वर्षांत दुप्पट व्हायच्या. तो काळ केव्हाच सरला आहे. बांधकाम व्यवसाय ही दुभती गाय राहिलेली नाही हे मान्य करायला हवे. त्यामुळे या व्यवसायीकांनी आपल्या कार्यपध्दतीत बदल करावे आणि लोकांचा या व्यवसायाप्रती असलेला दृष्टिकोन बदलावा असे मत त्यांनी व्यक्त केले. बांधकामांचा खर्च कसा नियंत्रणात ठेवता येईल, काम कमीत कमी वेळात कसे पूर्ण करता येईल, बांधकाम पूर्ण झालेली घरे तातडीने कशी विकता येतील या सर्व आघाड्यांवर व्यावसायीकांनी गांभिर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे. रेरा कायद्याने या व्यवसायाला ब-यापैकी शिस्त लागली असली तरी त्यात आणखी काही सुधारणांची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, या व्यवसायाला आधार देण्यासाठी सरकारी पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला.
कर्जाची प्रकरणे आॅनलाईन मुंजूर करा
या अडचणीच्या काळात बँका बांधकाम व्यावसायीकांच्या पाठिशी खंबिरपणे उभ्या राहतील आणि प्रोत्साहनपर पॅकेज दिली जातील अशी आशा नरडोकोच्या राजीव तलवार यांनी व्यक्त केली. तर, लॉकडाऊन संपल्यानंतर बांधकाम व्यवसायाला आवश्यक असलेल्या भांडवलासाठी पाच लाखांपासून ते पाच कोटींपर्यंतच्या अर्थसहाय्यासाठी सहकार्य व्हायला हवे. तसेच, दरमहा सुमारे एक लाख कर्जांची प्रकरणी निकाली काढली जातात. लॉकडाऊनमुळे त्यांचे काम रखडले असून बॅकांनी हे प्रस्ताव आॅनलाईन मंजूर करावे अशी मागणी नरडोकोचे महाराष्ट्रातील अध्यक्ष राजन बांदेलकर यांनी केली.