Join us

दीर्घकालीन विकास आराखडा बनवावा

By admin | Published: November 23, 2014 10:40 PM

सुरेश प्रभूंचे आदेश : कोकण रेल्वे स्थानकांवर सुधारणा हव्यात

रत्नागिरी : कोकण रेल्वेने विकासाचा दीर्घकालीन आराखडा बनवून रेल्वे मंत्रालयाला सादर करावा, असा आदेश केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानूप्रकाश तायल व अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत दिला. रेल्वेमंत्री झाल्यानंतर प्रभू यांनी कोकण रेल्वेच्या कामाचा आज मुंबईत आढावा घेतल्याचे कोकण रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. कोकण रेल्वेच्या विकासाबाबत दीर्घकालीन आराखडा बनविण्याबरोबरच कोकण रेल्वे प्रवाशांसाठी सर्वच रेल्वे स्थानकांवरील आवश्यक सुविधांमध्ये तत्काळ सुधारणा करावी. शहरी भागात रेल्वे विजेवर धावते. त्याच पध्दतीने कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरण करावे, हा कोकण रेल्वेचा प्रस्ताव लवकरच मार्गस्थ होईल, असेही प्रभू यांनी या बैठकीत स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता कोकण रेल्वेचे विद्युतीकरण लवकरच मार्गी लागण्याची शक्यता बळावली आहे. (प्रतिनिधी)प्रवासी सुरक्षिततेचाही प्रभूंनी घेतला आढावागेल्या आठ महिन्यांच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर अनेक अपघात झाले. त्याबाबत प्रभू यांनी गंभीर दखल घेतली आहे. प्रवाशांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. या व्यवस्थेचाही त्यांनी आढावा घेतला. मात्र, कोकण रेल्वेने भविष्यातील अपघात टाळण्यासाठी कृती आराखडा याआधीच तयार केला असून, त्याची अंमलबजावणीही सुरू झाल्याची माहिती तायल यांनी मंत्री प्रभू यांना दिली आहे.