एमव्हीपी नगर ते अमरनाथ टॉवर पूल लवकर बांधा, आमदार भारती लव्हेकर यांची विधानसभेत मागणी
By मनोहर कुंभेजकर | Published: July 28, 2023 02:13 PM2023-07-28T14:13:11+5:302023-07-28T14:14:50+5:30
Mumbai: वर्सोवा येथील एमव्हीपी नगर ते अमरनाथ टॉवर हा ४०० मीटरचा पूल गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे.परिणामी येथील नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.
मुंबई -वर्सोवा येथील एमव्हीपी नगर ते अमरनाथ टॉवर हा ४०० मीटरचा पूल गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे.परिणामी येथील नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.तसेच येथील नागरिकांना किमान वळसा घालून किमान २५-३० मिनिटांचा त्यांचा वेळ जातो आणि इंधनाचा अपव्यय होतो.त्यामुळे सदर पूल लवकर बांधवा अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
दि,२६ ऑगस्ट २०१५ साली राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पूलाला मान्यता दिली होती.मात्र अजूनही हा पूल झालेला नाही.त्यामुळे सदर पूल लवकर बांधून येथील वाहतूक कोंडी दूर करावी अशी मागणी लक्षवेधी सूचनेद्वारे वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी विधानसभेत केली.लोकमत सुद्धा याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला होता.
यावर उत्तर देतांना खारफूटीची वनविभागाला महापालिकेने देय असलेली १२ लाख ४ हजार रुपये रक्कम पोर्टल बंद असल्याने अजून दिली गेली नाही, ती कधी दिली जाईल,तसेच यासाठी नवीन कंत्राट दार नेमला आहे का?आणि किती टाईमबाउंड कालावधीत या पूलाचे काम सुरू होईल असा सवाल आमदार डॉ.लव्हेकर यांनी यावेळी केला.
यावर उत्तर देतांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की,या संदर्भात येथील राहिवाश्यांनी केलेली याचिका प्रथम मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आणि मग रहिवासी सर्वोच्च न्यायालयात गेले असता त्यांची याचिका फेटाळतांना त्यांना दोन लाखांचा दंड केला.वनविभागाला महापालिकेने देय असलेली सदर रक्कम पोर्टल बंद असल्याने दिली गेली नसल्याने ती मॅन्युअली देण्यात येईल.त्यामुळे १५ दिवसात टेंडरिंग प्रोसेस होवून काम सुरू होईल,आणि नवीन कंत्राट दार नियुक्त करण्यात येईल असे आश्वासन मंत्री महोदयांनी यावेळी दिले.मंत्रीमहोदयांच्या सकारात्मक आश्वासनामुळे येथील पूलाच्या कामाला लवकर सुरवात होईल असा विश्वास डॉ.भारती लव्हेकर यांनी लोकमत कडे व्यक्त केला.