कुर्ला येथील हिंदू स्मशानभूमीमधील मोकळ्या जागेत उद्यान उभारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:07 AM2021-05-08T04:07:19+5:302021-05-08T04:07:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील सोनापूर गल्ली येथील हिंदू स्मशानभूमीत जेथे पडिक, मोकळी जागा आहे किंवा जेथे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील सोनापूर गल्ली येथील हिंदू स्मशानभूमीत जेथे पडिक, मोकळी जागा आहे किंवा जेथे रानटी झाडे उगवली आहेत ती जागा साफ करून तेथे उद्यान किंवा बैठकीसाठीची उत्तम व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मुंबई महापालिकेने याकामी पुढाकार घ्यावा, आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा आणि उद्यान किंवा तत्सम कामे हाती घेत परिसराच्या सौंदर्यीकरणात भर घालावी, या मागणीवर जोर दिला जात आहे.
मुंबई महापालिकेच्या एल विभागाच्या अंतर्गत कुर्ला पश्चिमेकडील सोनापूर गल्ली येथील हिंदू स्मशानभूमी आहे. येथील परिसरात पडिक तसेच जमिनीवर रानटी झाडेझुडपे उगवली आहेत. त्यामुळे ती जागा वापरता येत नाही. येथील बहुतांश जागेचे सौंदर्यीकरण झाले आहे. मात्र काही जागा अनेक कारणांमुळे वापरत येत आहे. अगदी प्रवेशद्वाराच्या आत प्रवेश करताच उजव्या बाजूला असलेल्या कार्यालयालगत मोकळी जागा आहे. तेथे झाडे उगवली आहेत. हा परिसर मोठा आहे. येथील जागेवर छोटे उद्यान उभारले, बैठकीसाठीची व्यवस्था करण्यात आली तर जागेचा विनियोग होईल. शिवाय परिसराच्या सौंदर्यीकरणात भर पडेल.
मुंबई महापालिकेने, एल वॉर्डने यासाठी थोडे लक्ष दिले पाहिजे. पुरेसा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. जागेच्या सुशोभिकरणावर भर दिला पाहिजे. असे झाले तर निश्चितच याचा फायदा महापालिकेला होईल. कारण परिसर स्वच्छ होईल. आणि सुशोभिकरणात भर पडेल. परिणामी आता कोरोनाकाळात मुंबई महापालिकेने, एल वॉर्डने यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अथवा स्वत: काम हाती घेत परिसर सुशोभित करावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यात आले असून, पावसाळ्यापूर्वी येथील कामाला सुरुवात करण्यात यावी, जेणेकरून पावसाळ्यात येथील कामात अडचणी येणार नाहीत. काम लवकर होईल, अशी माहिती येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत राकेश पाटील यांनी दिली.
.............................