Join us

पन्नास वर्षांचा विचार करून पोलीस ठाण्यांची इमारत उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:06 AM

दर्जेदार कामे करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देशलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मंजुरी मिळालेल्या राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यांची ...

दर्जेदार कामे करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मंजुरी मिळालेल्या राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यांची व कर्मचारी वसाहतींची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. यासंदर्भात अडचणी असल्यास त्या तातडीने मार्गी लावण्यात याव्यात, तसेच कोणत्याही परिस्थितीत राज्यातील कायदा-सुव्यवस्था कायम राखली जावी, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिले.

पुणे, पिंपरी चिंचवड शहर, तसेच पुणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या इमारतींचे बांधकाम, मनुष्यबळाची उपलब्धता व कायदा-सुव्यवस्थेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मंत्रालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, अशोक पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील नव्याने मंजूर पोलीस ठाण्यांसाठी आवश्यक मनुष्यबळासह इमारत बांधकामांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावेत. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम राखण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मैदानात उतरुन काम करावे. कुठल्याही परिस्थितीत नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पोलीस ठाण्यांच्या इमारती निर्दोष व पुढील पन्नास वर्षांचा विचार करून बांधाव्यात. पोलीस ठाणी आणि कर्मचारी वसाहतींना अधिकच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी उद्योगांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध होण्याची शक्यताही अजमावून घ्यावी, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. पुणे, पिंपरी-चिंचवड, तसेच पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाच्यावतीने त्यांच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या कामांच्या सद्य:स्थितीचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले.