मुंबई - दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील गोरेगाव पूर्वेकडील नागरी निवारा परिषद वसाहतीमधील आयटी पार्कजवळील नाल्याची संरक्षक भिंत सोमवार दि, २४ जुलै रोजी रात्री ८.३० च्या सुमारास अतिवृष्टी मुळे दिंडोशी मतदार संघातील नागरी निवारा सोसायटी लगत असलेल्या आय टी पार्क समोरील रस्त्यालगत असणाऱ्या नाल्याची संरक्षण भिंत कोसळून रस्ता खचला होता.नागरी निवारा परिषदेतील आयटी पार्क जवळील परिसर हा सकाळ-संध्याकाळी वर्दळीचा असतो.
नाल्याची भिंत कोसळल्याने नाल्या शेजारील रस्ता देखील खचला आहे. यामुळे एक अवजड टेम्पो देखील या ठिकाणी अडकला होता. टेम्पो काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली.क्रेनच्या मदतीने खचलेल्या रस्त्यात अडकलेल्या टेम्पोला बाहेर काढण्यात आले. टेम्पोला बाहेर काढल्यानंतर आयटी पार्क जवळील एक मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती.लोकमतने यासंदर्भात लोकमत ऑनलाईन आणि लोकमत मध्ये सविस्तर वृत्त दिले होते
याची दखल घेत शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधिमंडळ मुख्य प्रतोद, प्रवक्ते, विभागप्रमुख, आमदार, माजी महापौर सुनिल प्रभू यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिका वरळी हब येथे पालिका उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांच्या दालनात सदर नाल्याची तत्काळ दुरुस्ती करण्यासाठी तातडीची बैठक घेतली. नागरी निवारा लगत असलेल्या नाल्यांच्या संरक्षण भिंती(आर.सी.सी) लवकर बांधण्यासाठी टेंडर काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
सदर जागेची पाहाणी करून लवकर याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश उल्हास महाले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे सदर काम लवकर मागरी मार्गी लागेल असा विश्वास आमदार सुनील प्रभू यांनी लोकमतकडे व्यक्त केला.
यावेळी मुंबईचे माजी उपमहापौर, प्रभाग क्र. ४० चे माजी नगरसेवक अँड. सुहास वाडकर, प्रभाग क्र. ४१ चे माजी तुळशीराम शिंदे तसेच महानगरपालिकेचे मुख्य अभियंता (एसडब्ल्यूडी) आर. ए. जहांगीरदार, माजी अभियंता (रस्ते) संजय बोरसे, माजी अभियंता (एसडब्ल्यूडी) नंदकिशोर पाटील, नागरी निवारा परिषद संस्थेचे अमित नेवरेकर, विनायक जोशी, मुकुंद सावंत व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.