Join us

टोकियो प्रमाणे मुंबईतील पूरपरिस्थिती रोखण्यासाठी जमिनीखाली बोगदे बांधा; सुनील प्रभूंची मुख्यमंत्र्याशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 7:07 PM

मनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : - जपानची राजधानी टोकियो मध्ये पूरपरिस्थितीवर नियंत्रणासाठी जमिनीखाली टाक्या आणि बोगदे बांधले ...

मनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : - जपानची राजधानी टोकियो मध्ये पूरपरिस्थितीवर नियंत्रणासाठी जमिनीखाली टाक्या आणि बोगदे बांधले आहेत. याच पद्धतीने सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅकच्या खालून भूमीगत जल बोगदा बांधून ते पाणी बॉक्स ड्रेनद्वारे पर्जन्य जलवाहिनी मध्ये सोडण्यात आले आहे. यामुळे यावर्षी हा परिसर पूर मुक्त झाला. अशाच पद्धतीने पाणी साचणारे भाग निश्चित करुन हे पाणी जमिनीखालील पेटी वाहिनी (बॉक्स ड्रेन) द्वारे, जमिनीखाली असलेल्या जल संचयन बोगदयात साठविले जाऊ शकते.

सखल भागात अशा पध्दतीचे जमिनी खालील पेटी वाहिनी व जल संचयन बोगदे अत्यावश्यक आहेत, यासाठी तांत्रिक सल्लागारांची नेमणूक करुन उपाय योजना करण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेला आदेश देण्यात यावेत. अशा मागणीचे निवेदन शिवसेना पक्ष प्रतोद, आमदार,माजी महापौर सुनिल प्रभू यांनी आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.वर्षा या शासकीय निवासस्थानी आमदार  प्रभू यांनी निवेदन दिले, व त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असे त्यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे मुंबईतील सखल भागात निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीवर उपाय म्हणून जमिनीखाली पेटी जलवाहिनी व जलसंचयन बोगदे बनविण्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्याची माहिती आमदार सुनिल प्रभू यांनी लोकमतला दिली.. 

वातावरणीय बदलामुळे पावसाळ्यात चार ते पाच तासात ढगफुटी सदृष्य पाऊस पडतो. समुद्राला मोठी भरती व लाटा उसळतात. यामुळे पाण्याचा निचरा न झाल्यामुळे नाले तुंबणे, मिठी सह मोठया नदयांना पूर येणे अशी परिस्थिती उद्भवते. मध्यंतरी मुंबई महानगरपालिकेने माधवराव चितळे समितीच्या शिफारशींनुसार सखल भागातल्या पाण्याच्या निच-यासाठी पंपींग स्टेशनसह ब्रिटीश कालीन पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढविण्यासाठी BRIMSTOWAD प्रकल्प हाती घेतला. 

मुंबई शहराच्या भौगोलिक रचनेमुळे आता ५० मि. मि. पेक्षा जास्त पाऊस पडल्यानंतरही नाले व पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये पाणी वाहून नेण्याची क्षमता नाही असे अभ्यासाअंती कळून आले आहे. याच काळात जर समुद्राला मोठी भरती असेल, तर हे पाणी उपसा करून समुद्रात सोडावे लागते. परंतू त्याला देखील मर्यादा आहे. पाणी निचरा होण्यासाठीच्या मोकळ्या जागांवर, पाणलोट क्षेत्रात क्रॉंक्रीटीकरण झाले आहे. यामुळेही जमीनीत पाणी मुरून निचरा होण्याचे प्रमाण कमी झाले आहे असेही आमदार सुनील प्रभू यांनी निवेदनात म्हंटले आहे.----------------------------------------

टॅग्स :उद्धव ठाकरेमुंबईपूर