Join us

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ४०.३४ कोटींची मालमत्ता जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 4:06 AM

ईडीची कारवाई : बँक खात्यासह पुणे, नागपूर, गोव्यातील फाइव्हस्टार हॉटेल, स्पाचा समावेशलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ...

ईडीची कारवाई : बँक खात्यासह पुणे, नागपूर, गोव्यातील फाइव्हस्टार हॉटेल, स्पाचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या वर्षभरापासून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची तब्बल ४० कोटी ३४ लाख रुपये किमतीची मालमत्ता सोमवारी जप्त करण्यात आली. त्यांच्या कंपनीचे शेअर्स, पुणे, नागपूर, गोव्यातील पंचतारांकित हॉटेल्स, स्पा आणि विविध बँकांतील त्यांच्या व कुटुंबियांच्या नावे असलेल्या खात्यातील ठेवीचा यात समावेश आहे.

अविनाश भोसले व त्यांच्या कुटुंबियांनी दुबईमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पद्धतीने कोट्यवधींची गुंतवणूक केल्याचे तपासातून समोर आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अविनाश भोसले हे काँग्रेसचे नेते व महाविकास आघाडीतील राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आहेत. त्यामुळे या कारवाईमुळे बांधकाम व्यावसायिकांबरोबरच राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.

ईडीने विदेशी विनिमय व्यवस्थापन अधिनियम १९९९ (फेमा) व मनी लॉड्रिंग अंतर्गत २०१७ मध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी आयकर विभागाने त्यांच्यावर टाकलेल्या छाप्यामुळे ते पहिल्यांदा चर्चेत आले. तेव्हापासून त्यांना परदेशात मालमत्ता खरेदी, गुंतवणुकीतील अनियमिततेबाबत नोटिसा पाठविल्या जात होत्या. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरू होता. अविनाश यांच्या शिवाय त्यांची पत्नी, मुलगा व विवाहित कन्या यांच्याकडे अनेक तास स्वतंत्रपणे चौकशी करून जबाब नोंदविण्यात आले होते. त्यानंतर भोसलेंच्या पुणे आणि मुंबईतील मालमत्तांवर छापेही टाकले होते. त्यानंतर आता ही मोठी कारवाई केली आहे. त्यामध्ये अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (एबीआयएल)मधील समभाग, तसेच विविध बँकांत असलेली १.१५ कोटींची रोकड जप्त केली.

यापूर्वी त्यांच्याकडून ईडीने फेमा कायद्यांतर्गत कारवाई करीत १ कोटी १३ लाखांचा दंड केला होता. २००७ मध्ये अमेरिका आणि दुबई दौरा करून भारतात येताना परकीय चलन आणि महागड्या वस्तू कस्टम ड्यूटी न भरता चोरून आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता.

जप्त केलेली मालमत्ता

भोसले कुटुंबाची विविध बँकांत असलेले ११५ कोटी रुपये, इक्विटी शेअर्स आणि प्रामुख्याने समभागाच्या रूपात आहे. त्याशिवाय पुण्यातील हॉटेल वेस्टिन, नागपुरातील हॉटेल ले मेरिडियन, गोव्यातील हॉटेल डब्ल्यू रिट्रीट अँड स्पा, गोवा आदींचा समावेश आहे,

अविनाश भोसले यांनी दुबईमधील इक्विटी शेअर्स खरेदी करणे, कौटुंबिक प्रमुखता कंपनी रोचडेल असोसिएट्स लिमिटेड, दुबईमधील इक्विटी शेअर्स खरेदी करणे, कौटुंबिक प्रमुखता आणि एनआरआयकडून कुटुंबाच्या देखभालीसाठी मिळालेली बचत आदी विविध प्रकारांमध्ये भारतातून निधी परदेशात पाठविला असल्याचे तपासातून समोर आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.