लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले याची अंमलबजावणी संचालनालयाकडून शुक्रवारी ६ ते ७ तास चौकशी करण्यात आली आहे. शनिवारी त्याला पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
अविनाश भोसले यांना ईडीने पुण्यातील जमीन खरेदीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात गुरुवारी समन्स बजावत सोमवारी चौकशीसाठी बोलावले आहे. तर, अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले यालादेखील समन्स बजावत २ जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अमित शुक्रवारी दुपारी मुंबईच्या ईडी कार्यालयात हजर झाला. त्याच्याकडे ६ ते ७ तास चौकशी करत त्याचा जबाब नोंदविण्यात आला आहे. तसेच काही कागदपत्रेही ताब्यात घेतल्याचे समजते. शनिवारी त्याला पुन्हा काही कागदपत्रांसोबत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.भोसले यांनी पुण्यात निवासी इमारतीच्या जागी अवैध इमारत बांधल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. भोसले यांनी संबंधित जमीन खरेदीसाठी बेकायदा व्यवहार केल्याचा आरोप आहे. यापूर्वी फेमा कायद्यांतर्गत ईडीने भोसले यांची पुणे व नागपुरातील मालमत्ता जप्त केली आहे.