Join us  

७४ कोटी थकविणारे बिल्डर मोकाट

By admin | Published: January 20, 2016 2:21 AM

शहर आणि उपनगरांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविणाऱ्या बिल्डरांना झोपडपट्टीतील नागरिकांच्या पर्यायी व्यवस्थेसाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने संक्रमण

तेजस वाघमारे,  मुंबईशहर आणि उपनगरांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविणाऱ्या बिल्डरांना झोपडपट्टीतील नागरिकांच्या पर्यायी व्यवस्थेसाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने संक्रमण शिबिरे भाडेतत्त्वावर दिली आहेत. संक्रमण शिबिरांतील घरे भाडेतत्त्वावर घेणाऱ्या ३५ बिल्डरांनी म्हाडाचे सुमारे ७४ कोटींचे भाडे थकविले आहे. तरीही म्हाडामार्फत या बिल्डरांवर कारवाई होत नसल्याने अधिकारीच बिल्डरांना घाबरत असल्याची चर्चा सुरू आहे.म्हाडाची ५६ संक्रमण शिबिरे आहेत. या संक्रमण शिबिरांतील घरे मुंबईतील मोडकळीस आलेल्या सेसप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करणाऱ्या आणि एसआरए योजना राबविणाऱ्या बिल्डरांना भाडेतत्त्वावर देण्यात येतात. मुंबई शहर आणि उपनगरांत एसआरए प्रकल्प राबविणाऱ्या सुमारे ३५ बिल्डरांनी ३ हजार ४०० घरे म्हाडाकडून भाडेतत्त्वावर घेतली आहेत. अनेक वर्षांपासून बिल्डरांची ही थकबाकी वाढतच चालली आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी म्हाडाने अनेक वेळा कारवाईच्या नोटीस पाठविल्या. दोन वर्षांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बिल्डरांची बँक खाती गोठविणे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली होती. परंतु अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर वसुली थांबली आहे. मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे यांनी पदभार घेऊन सात महिने उलटले तरी बिल्डरांवर कारवाई होत नसल्याने म्हाडा वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. वसुली थांबल्याने थकबाकीची रक्कम वाढून ती ७४ कोटींवर पोहोचली आहे. काही बिल्डरांनी एसआरए प्रकल्प पूर्ण केल्यानंतरही म्हाडाला संक्रमण शिबिरांचा ताबा दिलेला नाही.