रासायनिक कारखाने हलवण्यामागे बिल्डर!
By admin | Published: May 28, 2016 02:52 AM2016-05-28T02:52:48+5:302016-05-28T02:52:48+5:30
डोंबिवलीतील औद्योगिक वसाहतीत १०२ हेक्टर जमिनीवर नागरी वसाहती उभ्या राहिल्या असून बिनदिक्कत रासायनिक कारखान्यांना खेटून त्या बांधलेल्या आहेत. त्यामुळे आता गुरुवारच्या
- मुरलीधर भवार, डोंबिवली
डोंबिवलीतील औद्योगिक वसाहतीत १०२ हेक्टर जमिनीवर नागरी वसाहती उभ्या राहिल्या असून बिनदिक्कत रासायनिक कारखान्यांना खेटून त्या बांधलेल्या आहेत. त्यामुळे आता गुरुवारच्या स्फोटानंतर येथील रासायनिक कारखाने अंबरनाथमध्ये हलवण्यामागे बिल्डर लॉबी असल्याचा वास येथील उद्योजकांना येत आहे.
येथील औद्योगिक वसाहतीत स्थानिक कामगार, कर्मचारी काम करतात. या कारखान्यांना कच्चा माल पुरवणारे पुरवठादार याच शहरात आहेत. कारखान्यांमधील तयार मालाची वाहतूक करणारे वाहतूकदार आहेत. येथील रासायनिक कारखाने अन्यत्र हलवण्याचा निर्णय घेतला तर काही कारखानदार आपला व्यवसाय बंद करतील. थोडक्यात, कारखाने हलवण्याची भूमिका ही डोंबिवलीकरांच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणारी आहे.
प्रोबेस कंपनीत मोठा स्फोट झाल्याने नागरी वस्तीला लागून असलेले रासायनिक कारखाने स्थलांतरित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
डोंबिवलीतील औद्योगिक वसाहत १९६४ साली अस्तित्वात आली. ३४७ हेक्टर जागेवर फेज-१ आणि फेज-२ अशा दोन टप्प्यांत कारखाने वसले. एकूण ३४७ हेक्टर क्षेत्र हे उद्योगांकरिता होते. त्यापैकी २४४ हेक्टर जागेवरच कारखाने वसले. उर्वरित १०२ हेक्टर जागेवर रहिवासी वसाहत वसली. याचा अर्थ रासायनिक कारखान्यांनी नागरी वस्तीत अतिक्रमण केलेले नसून घरांच्या गरजेपोटी लोकांनी रासायनिक कारखान्यांशेजारी वास्तव्य करण्याची जोखीम पत्करली. डोंबिवली परिसरात ४१ रुग्णालये, ५३ शाळा-कॉलेजेस आहेत. त्यातील बहुतांश या औद्योगिक वस्तीला खेटून आहेत. डोंबिवलीतील कारखानदार व ‘कामा’ संघटनेचे माजी अध्यक्ष अभय पेठे यांनी सांगितले की, कारखाने स्थलांतरित करणे, हा उपाय असू शकत नाही.
कारखाने इतक्या मोठ्या प्रमाणात स्थलांतरित करणे शक्य नाही. कारखाने स्थलांतरित झाले तर शहराचे अर्थकारण बिघडेल. कारखान्यांशी निगडित काही पूरक साहित्य पुरवणारे छोटे व्यावसायिक असतात. त्यांची उपजीविका कारखान्यांवर अवलंबून असते. रस्ते व रेल्वे प्रवासात दररोज अपघात होऊन लोक मृत्युमुखी पडतात. त्यामुळे रस्ते व रेल्वे वाहतूक सेवा बंद केली जाते का? त्याचे उत्तर नाही, हे आहे. कारखान्यांच्या परिसरात बफर झोन असतो. त्याच्या मर्यादा एमआयडीसी व कल्याण-डोंबिवली महापालिकेने पाळायला हव्यात. मात्र, कल्याण-डोंबिवली महापालिका बफर झोनच्या मर्यादा पाळत नाही. रस्त्याच्या पलीकडे कारखान्यांच्या शेजारी बांधकाम परवानगी देते. काही ठिकाणी सोसायटीची आणि कारखान्यांची आवारभिंत एकच आहे. स्वस्त घरांच्या लोभापायी अनेकांनी कारखान्यांच्या जवळ घरे घेतली. तसेच बेकायदा बांधकामेही कारखाना परिसरांत फोफावली. सरकारने कारखाने स्थलांतरित करून समजा ते अंबरनाथ अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात हलवण्याचा निर्णय घेतला, तरी ते आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. तसेच स्थलांतरानंतर सगळेच कारखाने सुरू राहतील, अशी हमी देता येत नाही, असे पेठे यांनी सांगितले.
कारखाने स्थलांतरित करण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली होती. याविषयी ते म्हणाले की, त्यासंदर्भात उद्योगमंत्री व महापालिका आयुक्तांशी चर्चा झाली होती. (प्रतिनिधी)
बंद पडले कारखाने : उभे राहिले मॉल अन टॉवर
प्रीमिअर कंपनीची जागा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एका बिल्डरने लिलावात घेतली आहे. तसेच कल्याण-मोहने-आंबिवली येथील एनआरसी कंपनी बंद पडली आहे. ही जागादेखील मालकाने रहेजा बिल्डरला विकली आहे.
हा व्यवहार तूर्त वादग्रस्त ठरला आहे. इतकेच नव्हे तर २३ वर्षांपूर्वी बंद पडलेल्या स्टार कॉलनीतील प्रायमाटेक्स कंपनीच्या कामगारांना देणी देण्याचा वाद संपुष्टात आलेला नाही. त्या जागेवर ‘डी मार्ट’ उभे राहिले.
त्याचबरोबर, अंबरनाथ-बदलापूर मार्गावरील गॅरलिक इंजिनीअरिंग कंपनी १९८५ साली बंद पडली. ३५ एकर जागेवर ग्रीन पार्क उभारले आहे. त्याच्या लगतच्या जागेवर ‘डी मार्ट’ उभा राहिला आहे. कारखाने बंद पाडायचे अथवा स्थलांतरित करायचे. त्या जागेवर घरे बांधायची, हा सुप्त हेतू आहे.
अंबरनाथ-बदलापूर मार्गावरील गॅरलिक इंजिनीअरिंग कंपनी १९८५ साली बंद पडली. ३५ एकर जागेवर ग्रीन पार्क उभारले आहे. त्याच्या लगतच्या जागेवर ‘डी मार्ट’ उभा राहिला आहे. कारखाने बंद पाडायचे अथवा स्थलांतरित करायचे. त्या जागेवर घरे बांधायची, हा बिल्डरांचा सुप्त हेतू आहे, त्याचीच पुनरावृत्ती रासायनिक कारखाने स्थलांतरीत झाल्यावर पहायला मिळेल.