माझगावात बिल्डरची दहशत

By admin | Published: May 5, 2016 03:46 AM2016-05-05T03:46:17+5:302016-05-05T03:46:17+5:30

जाणीवपूर्वक इमारतीला धक्का पोहोचवणे आणि जागा बळकावण्यासाठी दहशत निर्माण करण्याचा एका बिल्डरचा प्रताप माझगाव परिसरात उघडकीस आला. या बिल्डरमुळे माझगाव येथील तांबावाला

Builder panic in Mazgaon | माझगावात बिल्डरची दहशत

माझगावात बिल्डरची दहशत

Next

मुंबई: जाणीवपूर्वक इमारतीला धक्का पोहोचवणे आणि जागा बळकावण्यासाठी दहशत निर्माण करण्याचा एका बिल्डरचा प्रताप माझगाव परिसरात उघडकीस आला. या बिल्डरमुळे माझगाव येथील तांबावाला इमारतीतील रहिवासी सध्या त्रस्त आहे. तांबावाला इमारती शेजारील दोन गाळे मध्यरात्री जेसीबी आणून तोडल्याचा आरोप या बिल्डरविरुद्ध आहे. याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माझगाव येथील म्हातार पाखडी मार्गावर अ‍ॅटलास मिल कंपाउंड परिसरात तांबावाला इमारत १९४० साली बांधण्यात आली. इमारतीत सध्या ८६ कुटुंबे आणि १६ व्यावसायिक गाळे आहेत. इमारतीशेजारी मिहीर दोषी यांची फॅक्टरी गेल्या ६० वर्षांपासून आहे. शनिवारी रात्री २ वाजून १५ मिनिटांनी जेसीबी आणून येथील गाळे पाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दोषी यांनी म्हटले आहे. जेसीबीच्या आवाजाने नागरिकांना जाग आली. रहिवाशांनी तत्परता दाखवत जेसीबी चालकांना रोखले आणि तातडीने फॅक्टरीचे मालक मिहीर दोषी यांना बोलावले. त्यामुळे ही फॅक्टरी पूर्ण जमीनदोस्त होण्यापासून बचावली. तथापि, दोषींच्या फॅक्टरीतील दोन गाळे तोडण्यात आल्याने दोषी यांनी भायखळा पोलीस स्थानकात बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल केला.
यासंदर्भात दोषी यांनी सांगितले, की बिल्डरने फॅक्टरीसंबंधीचे कोणतेही कायदेशीर व्यवहार माझ्याशी केलेले नाहीत. रहिवाशांकडून माहिती मिळाल्याने मला फॅक्टरी पाडण्यात येत असल्याचे समजले. त्यानंतर मी तातडीने पोहोचलो. तोपर्यंत फॅक्टरीचे बरेच नुकसान झालेले होते. सामानाचेही नुकसान झाले आहे. शिवाय तेव्हा बिल्डरकडून माझ्या वडिलांच्या फोनवर जीवे मारण्याची धमकीसुद्धा देण्यात आल्याचे दोषी यांनी तक्रारीत म्हटले आहे.
याविषयी रहिवासी दीक्षा कदम यांनी सांगितले की, शनिवारी ही घटना घडली. त्यावेळी आजूबाजूच्या परिसरातील दिवे बंद करण्यात आले होते.
इमारतीमागे असणाऱ्या इमारतीचे सीसीटीव्ही देखील जाणीवपूर्वक काढले होते. जेसीबी चालकांसोबत आलेल्या माणसांनी चेहरे झाकलेले असल्याने या माणसांना अंधारात ओळखणे कठीण झाले. जेसीबीच्या आवाजामुळे अगदी लागून असलेल्या इमारतीला हादरे बसत होते. हा प्रकार थांबवण्यासाठी सव्वा दोनच्या सुमारास पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन करून मदत मागण्यात आली. तथापि, भायखळा पोलीस ठाण्यातील कर्मचारी पहाटे ४ च्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. (प्रतिनिधी)

‘फॅक्टरीचे तोडकाम माझ्याकडून नाही’
तांबावाला परिवाराला मी ११ कोटी रुपये प्लॉटसाठी दिलेले आहेत. माझ्याकडे माझी मालकी सिद्ध करण्याचे सगळे पुरावे आहेत. माझ्या जबाबावेळी मी ही सगळी कागदपत्रे दाखवणार आहे. या जागेचा ताबा मी एकाला दिला आहे. त्या व्यक्तीकडून तोडकाम झाले आहे, माझ्याकडून नाही.
- राहुल शहा, सुमेर असोसिएट्स

पुनर्विकास करार केला़़़ पुढे काय ?
हुसेर ताहीर तांबावालाच्या मालकीची ही जागा असून, २००५ साली ही जागा त्यांनी सुमेर असोशिएटस्च्या रमेश शहा आणि राहुल शहा यांना विकली. सुमेर असोशिएट्सच्या नावे ही सुमारे १२ एकर जमीन आहे. तांबावाला इमारतीचा पुनर्विकासचा करार सुमेर असोशिएट्सने तांबावाला इमारतीतील रहिवाशांशी २००९ साली केला. त्यानुसार २०१२ साली त्यांना घराचा ताबा देणे अपेक्षित होते. पण करारानंतर रहिवाशांशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात आली नसल्याचे रहिवासी हर्षदा सुर्वे यांनी सांगितले.
फॅक्टरी तोडण्याची घटनेनंतर इमारतीवरही जेसीबी फिरवला जाईल, अशी भीती सध्या रहिवाशांना भेडसावत आहे. इमारतीतील ८६ कुटुंबांना आणि १६ दुकानधारकांचा विचार करून सुमेर असोशिएट्सने माझगाव परिसरातच ट्रान्झिट कॅम्प उभारावा, अशी आमची मागणी आहे. पण अद्याप या दिशेने कोणतीही पावले या बिल्डरने उचललेली नाहीत, असे तांबावाला इमारतीतील रहिवासी नीलम वाककर यांनी सांगितले.

बांधकाम तोडण्याची परवानगी कोणाकडून ?
बांधकाम तोडण्याची कोणतीही आॅर्डर नसताना इमारत परिसरातील फॅक्टरी मध्यरात्री जेसीबीच्या साहाय्याने पाडण्याचा प्रयत्न केला जातो. ही धक्कादायक गोष्ट आहे. या फॅक्टरीसोबत येथील रहिवाशांना जमीनदोस्त करण्याचे प्रयत्न बिल्डरकडून होत आहे. या ना त्या प्रकारे इमारतीतून रहिवाशांना बाहेर काढण्यासाठीचा हा प्रयत्न आहे
-एफ. ई. ब्रिगॅन्झा, रहिवासी

तोडकाम
मध्यरात्रीनंतर कसे ?
अगदी जागा रिकामी करायची झाली तरीही त्याची नोटीस कायद्यान्वये द्यायला हवी. शिवाय तोडकाम सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर करता येत नाही. या ठिकाणचे तोडकाम करताना परिसरातील सीसीटीव्ही जाणीवपूर्वक बंद करण्यात आले होते. परिसरातील वॉचमन्सना तीन दिवसांच्या सुटीवर पाठवण्यात आले होते. त्यामुळे हे तोडकाम ठरवून केलेले आहे.
-मिहीर दोषी, तांबावाला इमारतीशेजारील गाळेधारक

दोषी यांची
सुमेरविरुद्ध तक्रार
हुसेर ताहीर तांबावाला जागेवरून वादविवाद सुरू आहेत. सुमेर असोशिएट्सने ही जागा विकत घेतली आहे. जागेची कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत. त्यांना ही जागा रिकामी करून हवी आहे. दोषी यांनी सुमेर असोशिएटसविरुद्ध तक्रार दिली आहे. तर सुमेर असोसिएट्सकडूनही वॉचमनवर दोषी यांनी हल्ला केल्याची तक्रार दाखल केली आहे.
-अविनाश शिंगटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भायखळा पोलीस स्टेशन

Web Title: Builder panic in Mazgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.