Join us

फसवणूकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 1:57 AM

जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनाही फसवले

मुंबई : बनावट दस्तावेज बनवून पश्चिम उपनगरातील पाली हिल व अक्सा येथील सुमारे तीनशे कोटींच्या मालमत्तेवर दावा करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक समीर भोजवानीला मुंबईच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने गुरुवारी अटक केली आहे. दिव्यकांत खटाऊ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली. जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार व सायरा बानू यांनीही याबाबत जानेवारी महिन्यात फसवणुकीची तक्रार दिली असून त्या प्रकरणात त्याला अटकपूर्व जामीन मिळाला होता.पश्चिम उपनगरातील पाली हिल परिसरात अभिनेत्री सायराबानू यांच्या मिळकतीच्या बाजूलाच खटाऊ ट्रस्टची ३०० कोटींचा तीन एकरचा भूखंड आहे. बांधकाम व्यावसायिक भोजवानी याने बनावट दस्तावेज बनवून या भूखंडावर दावा केला होता. त्याबाबत दिव्यकांत खटाऊ यांनी तक्रार दिली होती. भोजवानी याने दिलीप, महेंद्र व हितेन खटाऊ याच्यासमवेत संगनमत करुन बनावट कागदपत्रांद्वारे मालमत्तेवर दावा सांगितला होता. तपासाअंती आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने भोजवानी व त्याच्या अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात त्याने अटकपूर्व जामीन मिळविला आहे.आता बनावट दस्तावेज बनवून पश्चिम उपनगरातील पाली हिल व अक्सा येथील सुमारे तीनशे कोटी रुपयांच्या मालमत्तेवर दावा केल्याप्रकरणी भोजवानीला मुंबईच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने अटक केली आहे. फसवणुकीचा गुन्हा सिद्ध झाल्यास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

टॅग्स :मुंबई