Join us

बिल्डरला महारेराचा दणका, ३४ तक्रारदारांना मिळाले पावणेपाच कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 6:18 AM

रायगड जिल्ह्यातील ३८ प्रकल्पांतील दिरंगाई आणि तत्सम बाबींसाठी ९९ प्रकरणी २२.२ कोटींचे वॉरंट्स जारी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महारेराकडून गृहनिर्माण प्रकल्पांमधील होणारा विलंब, त्यामुळे ग्राहकाला सोसावा लागणारा आर्थिक फटका, कालापव्यय आदींबद्दल बिल्डरांवर केली जाणारी कारवाई आता जोर धरू लागली आहे. अशापैकीच एन. के. गार्डनचे विकासक भूपेश बाबू यांच्या मालमत्तेचा लिलाव महारेराने करून त्या प्रकरणातील ३४ तक्रारदारांना ४ कोटी ७८ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

लिलावातून पैसे वसूल करून तक्रारदारांना नुकसानभरपाई मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. राज्यात आणखी काही ठिकाणी मालमत्ता जप्ती आणि लिलाव जाहीर होणार आहेत. महारेराने केलेल्या कारवाईंतर्गत २० एप्रिल रोजी पनवेल क्षेत्रातील मोरबी ग्रामपंचायतीत एन.के. गार्डनचे भूपेश बाबू यांच्या मालमत्तांचा लिलाव झाला होता. यात ३१ लाख ५७ हजार ही सर्वात जास्त नुकसानभरपाईची रक्कम आहे. तर ३ लाख ४८ हजार सर्वात कमी रक्कम आहे. याशिवाय ३४ पैकी ३० तक्रारदारांना तक्रारीचा खर्च म्हणून एकूण ६ लाख रुपये देण्यात आले. रायगड जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या सक्रियतेमुळे हे शक्य झाले आहे. भूपेश बाबू यांच्या मालमत्तांच्या लिलावात, या प्रकरणातील आधारमूल्य ३.७२ कोटी असताना लिलावात ४.८२ कोटींची बोली लागली. त्यामुळे ३४ तक्रारदारांना नुकसानभरपाईची मुद्दल रक्कम अदा करण्यात आली.

आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील ३८ प्रकल्पांतील दिरंगाई आणि तत्सम बाबींसाठी ९९ प्रकरणी २२.२ कोटींचे वॉरंट्स जारी करण्यात आले आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्ररायगड