Join us

डोंबिवली एसटी स्टँडवरही बिल्डरांचा डोळा

By admin | Published: March 30, 2016 1:43 AM

आधी शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आणि नंतर वाहतूक कोंडीचे कारण देत औद्योगिक निवासी परिसरात हलवलेल्या एसटी स्टँडच्या जागेवर सहा एकर जागेची संरक्षक भिंत तोडून

- जान्हवी मोर्ये,  डोंबिवली आधी शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आणि नंतर वाहतूक कोंडीचे कारण देत औद्योगिक निवासी परिसरात हलवलेल्या एसटी स्टँडच्या जागेवर सहा एकर जागेची संरक्षक भिंत तोडून अतिक्रमण सुरू आहे. आधीच एसटीसाठी शहरात राखून ठेवलेली जागा बळकावल्यानंतर आणि कोंडी फोडण्याच्या नावाखाली कल्याणच्या बस स्टँडची जागा बळकावण्याच्या हालचाली सुरू असतानाच डोंबिवलीतील स्टँडची जागाही बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव सुरु असल्याचे उघड झाले आहे. या बस स्थानकात दोन सुरक्षारक्षक आणि दोन वाहतूक नियंत्रक कार्यरत होते. त्यापैकी दिवसाचा एक सुरक्षारक्षक काढून घेण्यात आला, तर एक वाहतूक नियंत्रक कमी करण्यात आला आहे. लांब पल्ल्याच्या बसचा राबता येथे पहाटे तीनपर्यंत असतो. मात्र सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेदहादरम्यान येणाऱ्या बसची नोंद करण्यासाठी वाहतूक नियंत्रकही नसतो, याकडे लक्ष वेधत कोकण प्रवासी संघटनेने ही जागाही हडप केली जाण्याची भीती व्यक्त केली आहे. याविरोधात संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर शिर्के यांनी आवाज उठविला आहे.बस स्थानकाच्या सहा एकर जागेपैकी चार एकर वापराविना पडून आहे. त्यापैकी तीन एकर जागेत वाहन तळ विकसित केल्यास, आहे त्या जागेतील सुविधा वाढवल्यास त्यातून महामंडळाला उत्पन्न मिळेल आणि बस स्थानकाच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च भागविता येईल, असे प्रस्ताव एसटीला देण्यात आले. मात्र त्यावर त्यांनीही पुढे काही केले नाही. डोंबिवलीत मानपाडा रोडवर रेल्वे स्थानकापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर कस्तुरी प्लाझा या ठिकाणी बस डेपोसाठी जागा आरक्षित होती. त्यावर अतिक्रमण झाले. इमारती, शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले गेली. व्यवसाय थाटले. त्यातून पाच एकरांची ही जागा बिल्डरांच्या घशात गेली. त्यावर पालिकेने कोणताही कारवाई केली नाही. तसेच डेपोसाठी आरक्षित असलेल्या जागेवर झालेले अतिक्रमण हटविण्याची मागणीही महामंडळाने कधीच केली नाही. स्टेशन परिसरातील डेपोची मोक्याची आरक्षित जागा बिल्डरांनी गिळंकृत केल्यावर आता एमआयडीसीतील बस डेपोची जागा बळकावण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे बस स्थानक बंद पडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप शिर्के यांनी केला असून याकडे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीच लक्ष देण्याची मागणी केली आहे. गैरसोयींचेच आगार उन्हाळा सुरू झाला, सुट्या लागल्या की या बस स्थानकातील गर्दी वाढते. पण या स्टँडमधील आठपैकी चार ट्यूब बंद आहेत. सायंकाळी पाचनंतर पाण्याचा नळ बंद असतो. इतरवेळीही त्याला पाणी नसते. स्त्री -पुरुष प्रसाधनाची स्वतंत्र सुविधा नसल्याने हे बस स्थानक महिलांसाठी कायमच असुरक्षित आहे. रात्री-अपरात्री तेथे थांबणेही नकोसे होते. आवारात झुडपे वाढलेली आहेत. डासांचे साम्राज्य असते, भटक्या कुत्र्यांचा-जनावरांचा उपद्रव असतो. बसण्याच्या जागेची पुरेशी स्वच्छता नसते. कल्याण डेपोत संपर्क साधण्याची सुविधा नसल्याने तेथून, विठ्ठलवाडी, भिवंडी, पनवेल डेपोतून निघालेल्या बसबाबत कोणतीही माहिती मिळत नाही.