नोटिसींमुळे बिल्डरांचे धाबे दणाणले...! बोरिवली पूर्व, भायखळ्यात ७८ बांधकामे थांबविण्याच्या नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 13:51 IST2025-01-01T13:50:31+5:302025-01-01T13:51:30+5:30
नोटिसींमुळे बिल्डरांचे धाबे दणाणले...! बोरिवली पूर्व, भायखळ्यात ७८ बांधकामे थांबविण्याच्या नोटिसा

नोटिसींमुळे बिल्डरांचे धाबे दणाणले...! बोरिवली पूर्व, भायखळ्यात ७८ बांधकामे थांबविण्याच्या नोटिसा
मुंबई : पालिकेने काम बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर मंगळवारी भायखळ्यातील ३३ आणि बोरिवली पूर्वेतील ४५ बांधकांमाना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे बिल्डरांचे धाबे दणाणले असून अनेकांनी बिल्डरांची मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. नोटिसा दिलेली बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक नियमांची अंमलबजावणी केल्यानंतरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा स्तर बिघडू लागला आहे. या पार्श्वभूमीवर भूषण गगराणी यांनी बोरिवली पूर्व आणि भायखळ्यातील सरसकट सर्व बांधकामे २४ तासांत बंद करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, विकासकांनी बांधकामस्थळी नियम पाळत असल्याचे सिद्ध केल्यानंतरच त्यांना काम सुरू करण्याची परवानगी दिली जाईल, असेही पालिका आयुक्तांनी सांगितले. तसेच नोटीस बजावूनही कामे न थांबविल्यास संबंधितांविरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
मुंबई महानगर प्रदेशात नियम बंधनकारक
बांधकामाच्या ठिकाणी होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने तयार केलेली २८ नियमांची मार्गदर्शक तत्त्वे मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महापालिकांना बंधनकारक असल्याचे एमपीसीबीचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांनी स्पष्ट केले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई महानगरातील रेडिमिक्स सिमेंट प्रकल्पासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. तसेच वायू गुणवत्ता निर्देशांक जर सातत्याने २०० पेक्षा जास्त जात असेल तर त्या परिसरातील कारणीभूत उद्योग आणि बांधकामे ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (जीआरएपी ४) अंतर्गत बंद करण्यात येणार आहेत.