मुंबई, ठाण्यातील बिल्डरांनी थकविले म्हाडाचे १७२ कोटी रुपयांचे भाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 07:11 IST2025-03-12T07:11:16+5:302025-03-12T07:11:16+5:30

प्रसंगी जप्तीची कारवाई करणार, विधान परिषदेत गृहनिर्माण राज्यमंत्री भोयर यांची माहिती

Builders in Mumbai Thane owe MHADA Rs 172 crore in rent | मुंबई, ठाण्यातील बिल्डरांनी थकविले म्हाडाचे १७२ कोटी रुपयांचे भाडे

मुंबई, ठाण्यातील बिल्डरांनी थकविले म्हाडाचे १७२ कोटी रुपयांचे भाडे

मुंबई : मुंबईतील १६ विकासकांनी रहिवाशांसाठी म्हाडा संक्रमण शिबिरात भाडेतत्त्वावर गाळे घेतले होते. त्यांच्याकडून भाडे वसूल करण्याची कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत २७४ कोटी वसूल करण्यात आले आहेत. अजून १७२ कोटी थकबाकी आहे.

प्रसंगी विकासकांच्या मालमत्तेवर जप्ती आणून भाडे वसूल केले जाईल, अशी माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. तर, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी संक्रमण शिबिरात घुसलेल्या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी धोरण तयार केले जाईल, असे सांगितले.

भाजप आ. निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला राज्यमंत्र्यांनी उत्तर दिले.

संक्रमण शिबिरातील गाळ्यांच्या भाड्यापोटी थकीत रकमेचा भरणा न करणाऱ्या २२ विकासकांविरोधात सरकारचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

त्यातील सहा विकासकांविरोधात मंडळाने खेरवाडी पोलिस ठाण्यात जबाब नोंदवला आहे. वसुलीची कार्यवाही त्वरेने करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्यात येईल, असेही भोयर यांनी सांगितले.

'हायलँड स्प्रिंग'ची चौकशी

 ठाणे येथील हायलँड स्प्रिंग प्रकल्पाच्या विकासकाने अधिकचा फायदा झाल्यानंतर प्रकल्पाचे नाव बदलून हायलँड पर्ल केले. त्यामुळे सरकारची फसवणूक करणाऱ्या त्या विकासकावर कारवाई करण्याची मागणी आ. डावखरे यांनी केली. त्यावर भोयर यांनी तक्रार दाखल करून चौकशीचे आश्वासन दिले.

तपशील मिळवून बँक खाते गोठवणार

मुंबई, उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांना विकासकांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तांचा तपशील सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या बँक खात्यांची माहिती घेऊन ती गोठविण्यात येतील. थकबाकी भरेपर्यंत त्यांना इतर परवानग्या देऊ नये, असे निर्देश म्हाडा आणि एसआरएला देण्यात आले आहेत, असेही भोयर यांनी सांगितले.
 

Web Title: Builders in Mumbai Thane owe MHADA Rs 172 crore in rent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.