Join us  

सिडकोच्या नियोजनात बिल्डरचा फेरफार

By admin | Published: June 18, 2014 11:53 PM

सर्वत्र आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन सुरू असताना बिल्डरने सिडकोच्या नियोजनात असलेल्या गटारात फेरफार केल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे

कळंबोली : सर्वत्र आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन सुरू असताना बिल्डरने सिडकोच्या नियोजनात असलेल्या गटारात फेरफार केल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची चिन्हे निर्माण झाले आहे. असे असतानाही सिडकोकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. यासंदर्भात पाटील यांनी सहव्यवस्थापकीय संचालकांकडे लेखी तक्र ार केली आहे. त्यांच्याकडून कोणती कारवाई होते याकडे कळंबोलीकरांचे लक्ष लागले आहे.पनवेल-सायन आणि एमएच-४ बीमध्ये कळंबोली नोड विकसित करण्यात आले आहे. २१ व्या शतकातील विकसित आणि नियोजित शहर असा प्रचार करणाऱ्या सिडकोचे नियोजन किती पाण्यात आले, ते आत्माराम पाटील यांनी माहितीच्या अधिकाराखाली काही वर्षापूर्वी उघड केले. कळंबोली वसाहत ही समुद्र सपाटीपासून तीन मीटर खाली असल्याची माहिती उजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. इतकेच काय प्रशासनानेही मान्य करीत यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. मात्र सर्व उपाययोजना कुचकामी ठरत असून वसाहतीत कमी पाऊस झाला तरी ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचत असून अनेकदा बैठ्या घरात पाणीही साचते. त्याचबरोबर वसाहतीत अंतर्गत रस्ते डॅमेज होत असल्याचे निदर्शनास येत आहे. २६ जुलै २००५ साली तर कळंबोलीत मोठ्या प्रमाणात वित्त व मनुष्यहानी झाली होती. त्यानंतर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची ठिकठिकाणी रस्त्याला समांतर असे गटारे बांधण्यात आले. मात्र प्लॉट नं. ४ सेक्टर ९ ई येथे निल सिद्धी डेव्हलपर्स या बांधकाम व्यावसायिकाने त्याच्या इमारतीभोवती असलेल्या गटारांची उंची कमी केली आहे. याकरिता सिडको प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेतली नाही. ही जागा पार्किंगसाठी वापरण्याचा घाट त्याने घातला असून स्वत:च्या स्वार्थासाठी संबंधित बांधकाम व्यावसायिकाने कळंबोलीतील आपत्ती व्यवस्थापन धोक्यात आणले आहे. हे काम उघड उघड सुरू असताना सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या कामाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचे कळंबोलीकरांचे म्हणणे आहे. यासंदर्भात सिडकोचे कार्यकारी अभियंता चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. (वार्ताहर)