मुंबई : माजिवडे ( ठाणे) येथील एक भूखंड मालक मृत असतानाही त्याचा बनावट अंगठा तयार करून जमिनीचे नियमबाह्य फेरफार करण्यात आल्याच्या प्रश्नावरून विरोधकांनी आज विधानसभेत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची चांगलीच कोंडी केली. ही माहिती सध्या आपल्याकडे नाही़ आपण ती पटलावर ठेवू, असे सांगत खडसे यांनी स्वत:ची सुटका करवून घेतली. माजिवडे येथील जगन्नाथ बाळा पाटील यांचा भूखंड एका बिल्डरने हडप केल्याबद्दलचा प्रश्न विनायक पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याचे खडसे यांनी सांगितले. मात्र त्यांच्या या उत्तराने समाधान न झालेल्या विरोधकांनी संबंधित बिल्डरचे नाव काय, अशी विचारणा वारंवार केली. सरकारला नाव सांगण्यात अडचण काय आहे, असा सवाल केला. आपल्याकडे सध्या माहिती नाही़ आपण ती पटलावर ठेवू, असे सांगत खडसे यांनी आपली सुटका करून घेतली. बिल्डरच्या संपर्क साहाय्यकाचे नाव काशिनाथ कमलाकर लोखंडे असल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी करताच मंत्र्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला. (विशेष प्रतिनिधी)निकृष्ट बियाण्यांमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई देण्याची तरतूद केंद्र सरकारच्या बियाणेविषयक कायद्यामध्ये करावी, अशी विनंती राज्य शासनातर्फे केंद्राला करण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी त्र्यंबकराव भिसे यांच्या मूळ प्रश्नात दिली. महाबीजच्या बियाण्यांचा दर्जा सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा निश्चित विचार केला जाईल, असे ते म्हणाले. नुकसानीची पुन्हा पाहणीघारगाव (ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर) येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पुन्हा पाहणी केली जाईल, असे आश्वासन कृषी राज्यमंत्री राम शिंदे यांनी राहुल जगताप, वैभव पिचड यांनी विचारलेल्या प्रश्नात दिले. या आधी तेथे अधिकारी गेले होते, पण नुकसान आढळले नाही़ मात्र पुन्हा पाहणी केली जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. नुकसानीचे पंचनामे वरच्या आदेशाची वाट न पाहता तातडीने करण्यास सांगितले आहे, असे ते म्हणाले.
बिल्डरचे नाव मंत्र्यांना सापडेना !
By admin | Published: March 28, 2015 1:41 AM