मुंबई : भांडुप येथील मोक्याच्या जागेवर पाणी सोडावे लागत असतानाच महापालिकेचा आणखी एक भूखंड विकासकाच्या घशात जाणार आहे. भायखळा येथील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेच्या विस्तारासाठी जिल्हाधिकाºयांकडून सात एकर जागा महापालिकेला मिळाली होती. मात्र ही आरक्षित जागा विकासक मफतलालच्या ताब्यात गेली असल्याचे सुधार समितीच्या बैठकीत आज उघड झाले. ही जागा विकासकाकडून परत मिळविण्याची मागणी सुधार समितीने केली आहे.भायखळा येथील १४ एकर जमिनीपैकी सात एकर जमीन राणीबागेच्या विकासासाठी राखून ठेवण्यात आली होती. उर्वरित सात एकर जागेमध्ये गिरणी कामगारांसाठी घरे आणि संबंधित विकासकाला जागा देण्यात आली. मात्र या विकासकाने पालिकेच्या सात एकर जागेवरही ताबा घेऊन न्यायालयातून स्थगिती मिळवत महापालिकेला झटकाच दिला. शिवसेनेचे रमाकांत रहाटे यांनी याबाबत सुधार समितीत हरकतीच्या मुद्दा मांडला.पालिकेला मोक्याच्या ठिकाणी असलेल्या सात एकर जागेवर पाणी सोडावे लागते ही प्रशासनाची निष्क्रियताच असल्याचा आरोप सदस्यांनी केला. संबंधित विकासकाने ही जागा पेनिन्सुलाला दिली असून या जागी टॉवरचे बांधकामही सुरू झाले आहे. तसेच विकासक पालिकेकडे विकास हस्तांतरण हक्क किंवा ६०० कोटी रुपये देण्याची मागणी करीत असल्याचे रहाटे यांनी सांगितले. यावर सदस्यांनी संताप व्यक्त केला. याबाबत कार्यवाही करून ही जागा ताब्यात घ्यावी, अशी मागणी सदस्यांनी केली.
मोक्याच्या ठिकाणचा भूखंड बिल्डरकडून हडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 2:24 AM