सिमेंट, स्टील उत्पादन क्षेत्रातील अकृत्रिम भाववाढीचा बिल्डरांनी केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:06 AM2021-02-13T04:06:27+5:302021-02-13T04:06:27+5:30
मुंबई : सिमेंट आणि स्टीलनिर्मिती क्षेत्रातील कार्टेलिंग, तसेच कृत्रिम भाववाढीने त्रस्त झालेल्या बांधकाम क्षेत्रातील व्यापारी, कंत्राटदार आदींनी शुक्रवारी ‘बिल्डर्स ...
मुंबई : सिमेंट आणि स्टीलनिर्मिती क्षेत्रातील कार्टेलिंग, तसेच कृत्रिम भाववाढीने त्रस्त झालेल्या बांधकाम क्षेत्रातील व्यापारी, कंत्राटदार आदींनी शुक्रवारी ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया’तर्फे एक दिवसाचे आंदोलन केले. सिमेंट आणि स्टीलनिर्मिती क्षेत्रासाठी नियामक आयोग नेमावा या मागणीसाठी मुंबई महानगर प्रदेशात सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत सर्व प्रकल्पांवरील कामे बंद ठेवून लाक्षणिक आंदोलन करण्यात आले.
सिमेंट आणि स्टीलनिर्मिती क्षेत्रातील अपप्रवृत्तींविरोधात संघटनेने कायदेशीर लढाई सुरू ठेवली आहे. वेळोवेळी सरकारी अधिकारी आणि संस्थांपर्यंत आपले म्हणणे मांडले आहे. अशा अपप्रवृत्तींचा फटका हा सरतेशेवटी सामान्य माणसाला बसतो, असे असोसिएशनच्या मुंबई केंद्राचे अध्यक्ष मोहिंदर रिझवानी यांनी स्पष्ट केले, तर या क्षेत्राकडून अकृत्रिम नफेखोरी आणि पिळवणूक सुरू आहे. ती थांबविण्यासाठी सरकारने तात्काळ पावले उचलावीत. तसे झाले तरच लाखो लोकांच्या हाताला काम देणाऱ्या बांधकाम व्यवसायातील रोजगार वाचू शकतील, असे असोसिएशनचे प्रदीप नागवेकर यांनी सांगितले.
मुंबई आणि आसपासच्या शहरांमधील बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील सर्व घटक या आंदोलनात सहभागी झाले. क्रेडाई आणि बांधकाम क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तत्सम संस्था, त्यांचे सदस्यही त्यात सहभागी झाले होते.