Building Collapse: आदित्य ठाकरे मध्यरात्री 2 वाजता ऑन द स्पॉट, इमारत दुर्घटनाग्रस्तांची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 11:58 AM2022-06-28T11:58:22+5:302022-06-28T12:00:06+5:30
कुर्ला इमारत दुर्घटना परिसरात एनडीआरएफच्या जवानांकडून रात्रभर बचावकार्य सुरू होते.
मुंबई - पावसाळ्याला सुरुवात होताच मुंबईतील कुर्ला परिसरात एक चार मजली इमारत कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली. कुर्ला बस डेपोच्या जवळच असलेली नाईक नगर सोसायटी नावाची ही 4 मजली इमारत मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. इमारतीची संपूर्ण एक विंग कोसळल्यानं सर्वत्र खळबळ उडाली. त्यानंतर, घटनास्थळावर अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांचीही तुकडी तातडीनं पोहोचली. या दुर्घटनेत 1 जण मृत्यू झाला असून काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री 2.00 वाजता घटनास्थळाला भेट दिली.
कुर्ला इमारत दुर्घटना परिसरात एनडीआरएफच्या जवानांकडून रात्रभर बचावकार्य सुरू होते. यात जवानांनी 13 जणांना सुखरुप बाहेर काढलं आहे. त्यांच्यावर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्याप मृत्यूचा कोणताही आकडा समोर आलेला नाही. तरी ढिगाऱ्याखाली आणखी 13 ते 15 जण अडकले असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
It is my earnest request to Mumbaikars residing in dilapidated accommodations, to please take the notice from @mybmc and other authorities seriously and vacate the premises at the earliest. It can be of great help during such unfortunate circumstances pic.twitter.com/3CmUTbNUZv
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 28, 2022
कॅबिनेटमंत्री आदित्य ठाकरे यांनी रात्री 2 वाजता कुर्ल्यातील इमारत दुर्घटनास्थळी भेट दिली. यावेळी, संबंधित अधिकारी आणि यंत्रणेशी संवाद साधत त्यांनी मदत व बचावकार्य वेगात सुरूच ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करत जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्याचंही त्यांनी ट्विटवरुन सांगितलं. मुंबई महापालिकेकडून पाठविण्यात आलेल्या नोटिसांची पुनर्तपासणी करण्यात येईल. अशा जीर्ण झालेल्या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे की, मुंबई महापालिकेकडून देण्यात येणारी नोटीस रहिवाशांनी घ्यावी आणि लवकरात लवकर अशा इमारती खाली कराव्यात. त्यामुळे, महापालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांनाही अशा परिस्थितीत काम करणं मदतीचं ठरेल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
.@mybmc fire brigade & NDRF have been conducting rescue operation at the unfortunate building collapse at Kurla, late last night. Visited the spot at 2 am. 13 people have been rescued & 15 reportedly still feared to be trapped. I hope & pray for the well being of all. pic.twitter.com/EzOOeMwU4s
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 28, 2022
एकनाथ शिंदेंकडून मदत जाहीर
नाईक नगर, कुर्ला (पू) येथे २७ जुलै रोजी रात्री 11.40 वाजता ही 4 मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुःखद घटनेची माहिती कळताच स्थानिक नागरिकांकडून त्वरित वर अडकलेल्या लोकांना सुरक्षीत खाली उतरवण्यात आले. अग्निशामक दल, महानगरपालिका व पोलिस यंत्रणेच्या सहाय्याने सध्या बचाव कार्य सुरू आहे. या दुर्घटनेची दखल गुवाहटीत असलेले बंडखोर नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतली. एकनाथ शिंदेंकडून दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आणि जखमींच्या कुटुंबीयांस 1 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. शिंदेंच्या आदेशानुसार स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांच्यावतीने ही मदत देण्यात येईल, असेही सांगण्यात आले.