मुंबई : मालाड पूर्वेकडील विजयद्वार इमारत मंगळवारी दुपारी दीड ते तीन इंच जमिनीत खचल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. रहिवाशांच्या जिवाला धोका निर्माण होण्याआधी पालिका प्रशासनाकडून इमारत रिकामी करण्यात आली.दफ्तरी मार्गावरील विजयद्वार इमारत ही ४० वर्षी जुनी असून, त्यात एकूण १४ कुटुंबे राहत होती. तसेच इमारतीत सात निवासी घरे आणि सात गाळे होते. ही इमारत तीन मजली होती. याची मालकी खासगी आहे.स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या स्ट्रक्चरल आॅडिटचा अहवाल सोसायटीच्या रहिवाशांनी २०१५ साली महापालिकेला दिला होता. मात्र त्यानंतर अहवालाची महापालिका प्रशासनाने दखल घेतली नाही. दुर्दैवाने मंगळवारी इमारत एका बाजूला खचल्याची घटना घडली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत व जवळ असलेली जमजम बेकरी रिकामी करण्यात आली. इमारतीतील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपावर शांताराम तलाव महापालिका शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. दरम्यान, घटना घडल्यावर महापालिकेच्या अधिकाºयांनी घडनास्थळी धाव घेतली. सद्य:स्थितीमध्ये इमारतीला लाकडी आणि स्टील बांबूच्या साहाय्याने आधार देण्याचे काम सुरू करण्यात आहे.इमारतीच्या दुरुस्तीसाठी महापालिकेला पत्र देण्यात आले होते. मात्र याकडे कोणी लक्ष दिले नाही. जीवितहानी होण्याआधीच रहिवाशांनी पूर्वसूचना देऊन इमारत रिकामी करण्यात आली आहे, असे या इमारतीतील रहिवासी गणपत दवे यांनी सांगितले.
मालाड येथील विजयद्वारही खचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 6:05 AM