मुंबई : धोकादायक असल्याने दुरुस्तीचे काम सुरु असलेल्या कामाठीपुरा येथील तीन मजली इमारत आज दुपारी अचानक कोसळली़ या दुर्घटनेत सहा ठार तर तीनजण जखमी झाले आहेत़ या इमारतीमध्ये सुरु असलेल्या बेकायदा बांधकामामुळे निष्पाप लोकांचा बळी गेला असल्याचा आरोप आता होत आहे़ग्रँटरोड परिसरात कामाठीपुरा येथील १४ व्या गल्लीत गुलमहल ही तीन मजली इमारत आहे़ इमारतीच्या तळमजल्यावर बिअर बारचे दुकान असून पहिला मजल्यावर चार भाडेकरु राहत होते़ ९० वर्षे जुनी असलेली ही इमारत म्हाडाने धोकादायक जाहीर करुन खाली करण्याची नोटीसही दिली होती़आज दुपारी दोनच्या सुमारासही इमारत पत्त्यासारखी कोसळली़ इमारतीची दुरुस्ती सुरु असल्याने आत कोणीच नसल्याचे अंदाज सुरुवातीला व्यक्त होत होता़ परंतु अग्निशमन दलाने मदतकार्य सुरु करताच काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचे आढळून आले़ काही तासांतच ढिगारा उपसून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले़ तर दोनजणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ कोसळलेल्या इमारतीच्या बाजूच्या इमारतीही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रिकाम्या करण्यात आल्या. या इमारतींतील रहिवाशांना संक्रमण शिबिरात हलविण्यात आले आहे़ या दुर्घटनेची चौकशी स्थानिक पोलिस ठाण्यात सुरु असून अद्याप गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. (प्रतिनिधी)मृतांची नावेमृतांमध्ये सरतुल्ला मुल्ला (२८), अंगद चौबे (४५), वसीम मुल्ला (१४) यांचा समावेश असून, उर्वरित तिघांची अद्याप ओळख पटली नव्हती. केनुल मुल्ला (२६), जाबाज मुल्ला (३०), मोहम्म जाफरी (५०) यांच्यावर जे़जे आणि नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.चौकशीची मागणी कामाठीपुरा परिसरात सुमारे पाचशे बेकायदा बांधकामे असतील, असा अंदाज व्यक्त होत आहे़ अशा बेकायदा बांधकामांची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे़
मुंबईत इमारत कोसळली
By admin | Published: May 01, 2016 3:36 AM