घरबांधणीचा परवाना घेऊन उभारल्या इमारती
By Admin | Published: January 12, 2015 10:17 PM2015-01-12T22:17:59+5:302015-01-12T22:17:59+5:30
सरपंच, ग्रामसेवकांना हाताशी धरुन अनेक बांधकाम व्यावसायिकांनी घरबांधणी परवाना घेऊन त्या जागी टोलेजंग इमारती उभारल्या आहेत
पनवेल : सरपंच, ग्रामसेवकांना हाताशी धरुन अनेक बांधकाम व्यावसायिकांनी घरबांधणी परवाना घेऊन त्या जागी टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोणतेही तांत्रिक शिक्षण नसताना ग्रामसेवकांनी आपले हात ओले करुन घेत इमारतीचे प्लॅन पास करुन अनधिकृत बांधकामांना खतपाणी घातले आहे.
‘नयना’ क्षेत्रातील अशा इमारती सिडकोने अनधिकृत ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला असल्याने सदनिकाधारकांचे धाबे दणाणले आहेत. पनवेल येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरु झाली आहे. या प्रकल्पामुळे पनवेल परिसराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे जमिनीचे भाव त्याचबरोबर घरांचे दरसुद्धा गगनाला भिडले आहेत.
तालुक्यातील २३ गावांतील ३६८३ हेक्टर क्षेत्राचा विकास आराखडा तयार केला आहे. मात्र यापैकी काही क्षेत्रांवर बांधकाम व्यावसायिक इमारती उभारून मोकळे झाले आहेत. त्यामध्ये कित्येक इमारती या बेकायदेशीर असून त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बिनशेती परवाना घेतलेला नाही. वास्तविक पाहता अशाप्रकारे इमारती उभारण्याअगोदर बिनशेती करणे क्रमप्राप्त आहे. त्यानंतर त्या जागेवर बांधकाम करता येते. त्याचबरोबर नगररचना विभागाकडून प्रास्ताविक इमारतीचा प्लॅन मंजूर करणेही बंधनकारक आहे. नगररचना विभागात अभियंते, तंत्रज्ञ सर्व तांत्रिक बाबींची तपासणी करुन या प्लॅनला हिरवा कंदील देतात. त्याचबरोबर त्यामध्ये काही त्रुटी असतील तर दूर करण्याकरिता प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत परत पाठवला जातो.
नगररचनाकाराने मंजूर केलेल्या प्लॅन हा तांत्रिकदृष्ट्या अतिशय योग्य असतो. त्यानुसार बिल्डरने बांधकाम करणे क्रमप्राप्त आहे. मार्जिंग स्पेस, उंची, पायाभूत सुविधा आदी सर्व बाबी नगररचना विभागात तपासल्या जातात. त्याप्रमाणेच इमारती बांधाव्या लागतात. सर्व अटी व शर्तींची कटकट नको म्हणून शेकडो बिल्डरांनी बिनशेती परवाना आणि टाऊन प्लॅनिंगची परवानगी न घेता इमारती उभारल्या आहेत.
एखादा वास्तुविशारद गाठून त्यांच्याकडून प्लॅन तयार करुन घ्यायचा, त्याच्यावर ग्रामसेवकाची सही आणि शिक्का घ्यायचा, झाला मंजूर गृहप्रकल्प, अशी स्थिती नयना क्षेत्रातील अनेक गावांत पाहावयास मिळाली आहे. (वार्ताहर)