रायगड येथे उभारणार बल्क ड्रग पार्क
स्थानिकांना विश्वासात घेऊन काम करावे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील औषधांच्या पुरवठ्याची क्षमता असलेल्या राज्यातील महत्त्वाकांक्षी रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित बल्क ड्रग पार्कची उभारणी करताना स्थानिकांना विश्वासात घेऊन काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि रोहा या तालुक्यातील १७ गावांच्या जमिनीवर हा प्रकल्प प्रस्तावित आहे. कोणत्याही गावाचे स्थलांतर होणार नाही. स्थानिकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणारा तीस हजार कोटी गुंतवणुकीचा आणि अंदाजे ७५ हजार लोकांना रोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प असणार आहे. यासंदर्भातील सादरीकरण उद्योग विभागातर्फे गुरुवारी मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र दळवी यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, याठिकाणी उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पांमध्ये भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध व्हावा, तसेच रोजगारासाठी लागणारी कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी. प्रत्यक्ष जमिनीवरचे सर्वेक्षण व्हावे, शक्य असेल तिथे बागायतीचे संरक्षण व्हावे. स्थानिकांना सर्वोत्तम मोबदला मिळेल यासाठीचा सर्वंकष आराखडा तयार करून स्थानिकांशी चर्चा करून या प्रकल्पाची आखणी करावी.
यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी, भूसंपादनाच्या मोबदल्याव्यतिरिक्त पीएपीसाठी दहा टक्के विकसित भूखंड देण्यात येणार असल्याचे सांगितले. या भूखंडाचा वापर व्यावसायिक, औद्योगिक आणि निवासी वापरासाठी करता येऊ शकेल. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना कायम स्वरूपाचे उत्पन्न मिळेल. स्थानिकांच्या कौशल्य विकासासाठी कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
............................