Join us

आयआयटी गेटसमोर पुन्हा पकडला बैल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 2:00 AM

मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास कोंडवाडा विभागाचे कर्मचारी किरण साबळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मुंबई : पवईतील आयआयटी गेटसमोर मंगळवारी संध्याकाळी अजून एक बैल पकडण्यात आला. गुरांचा कोंडवाडा विभागाने ही कारवाई केली. दोन आठवड्यांपूर्वी मोकाट बैलाने दिलेल्या धडकेत विद्यार्थी जखमी झाल्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली होती.

मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास कोंडवाडा विभागाचे कर्मचारी किरण साबळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्या वेळी त्यांना स्थानिकांनी काही प्रमाणात विरोध केला. मात्र विद्यार्थ्यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेत बैलाची सुटका करण्यास या पथकाने साफ नकार दिला. गेल्या वेळी म्हणजे १५ जुलै रोजी अशाच प्रकारे एक जनावर या विभागाने रस्त्यावरून ताब्यात घेतले होते, तेव्हा आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना विरोध केला. तसेच एका नगरसेवकानेही संबंधित कर्मचाऱ्यांना फोन करून या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणालाच न जुमानता कोंडवाड्याने ही कारवाई केल्याने नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

आयआयटी परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा वावर आहे. १२ जुलैला आयआयटी गेटसमोरच एका विद्यार्थ्याला बैलाने जोरदार धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. या प्रकारानंतर कोंडवाडा विभाग कारवाई करीत नसल्याचा आरोपही करण्यात येत होता. त्यामुळे कोणत्याही दबावाला न जुमानता यापुढेही ही कारवाई अशीच सुरू ठेवली जाणार असल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले.