मॅरेथॉनमध्ये बुलेटही धावल्या...
By admin | Published: January 18, 2016 02:48 AM2016-01-18T02:48:20+5:302016-01-18T02:48:20+5:30
मॅरेथॉनमधील प्रत्येक धावपटूचा श्वास न् श्वास कॅमेऱ्यात छायाचित्रकार कैद करत होता. पण तोल सांभाळून बाईक चालवण्याची खरी करामत होती बुलेट ग्रुपची
महेश चेमटे, मुंबई
मॅरेथॉनमधील प्रत्येक धावपटूचा श्वास न् श्वास कॅमेऱ्यात छायाचित्रकार कैद करत होता. पण तोल सांभाळून बाईक चालवण्याची खरी करामत होती बुलेट ग्रुपची. धावपटूंच्या गतीनुसार त्यांना त्यांच्या बाईकच्या वेगावर नियंत्रण ठेवावे लागत होते. विशेष म्हणजे, त्यांना राजीव गांधी सागरी सेतूवर केवळ आजच प्रवेश होता. त्यांनी मॅरेथॉन पूर्ण केली तीही चक्क बुलेट मोटारसायकलवर. धावपटूंसोबत मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या रायडर्सवर टाकलेला खास दृष्टिक्षेप ‘लोकमत’च्या वाचकांसाठी.
मुंबई मॅरेथॉनमध्ये विविध गटांत हजारो स्पर्धक सहभागी झाले. त्या स्पर्धकांसोबत सावलीप्रमाणे राहण्याची जबाबदारी मुंबईतील ‘एनडीथॅम्पर्स’ या बुलेट गु्रपवर होती. गेली सात वर्षे हा गु्रप मुंबई मॅरेथॉनशी जोडला गेला आहे. मुंबईत २००१ साली या गु्रपची स्थापना करण्यात आली. ‘भारतातील सर्वांत पहिला बुलेट संघ’ अशी या संघाची ओळख आहे. ‘पर्यटन, पर्यटन आणि फक्त पर्यटन’ करण्याच्या उद्देशाने हा बुलेट संघ तयार करण्यात आला. यंदाच्या मॅरेथॉनसाठी १४ बुलेट धावपटूंच्या सोयीसाठी विविध साधनसामग्रीने सज्ज झाल्या होत्या. ३ बुलेट या छायाचित्रकारांसाठी ठेवण्यात आल्या होत्या. ५ ट्रेकिंग बुलेट म्हणजे मॅरेथॉनमधील भारतीय पुरुष आणि महिला; आंतरराष्ट्रीय पुरुष आणि महिला या प्रत्येकांच्या हालचाली टिपण्याचे काम ट्रेकिंग बुलेटचालकांनी रविवारी केले. वैद्यकीय उपचार केंद्रात दाखल करण्यासाठी २ बुलेट सज्ज होत्या. प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांची ने-आण करण्यासाठी २ बुलेट अशी विभागणी करण्यात आली होती. ज्या धावपटूंना बक्षीस जिंकायचे नाही पण त्यांना रेस पूर्ण करायची आहे, अशा खास लोकांसाठी २ बुलेट राखीव ठेवण्यात आल्या होत्या. (क्रीडा प्रतिनिधी)