Join us

बुलेट ट्रेन आणि मेट्रो प्रकल्पामुळे २९० झाडे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:06 AM

मुंबई : बुलेट ट्रेन आणि मेट्रो ७ अ प्रकल्पामुळे किमान २९१ झाडे बाधित झाली आहेत. पालिकेच्या उद्यान विभागाने अलीकडेच ...

मुंबई : बुलेट ट्रेन आणि मेट्रो ७ अ प्रकल्पामुळे किमान २९१ झाडे बाधित झाली आहेत. पालिकेच्या उद्यान विभागाने अलीकडेच या झाडांचे पुनर्रोपण आणि तोडण्यासंदर्भात सार्वजनिक नोटीस बजावून नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविल्या आहेत.

पायाभूत सोयीसुविधांच्या प्रकल्पासाठी झाडांची कत्तल नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. मेट्रो कारशेडसाठी आरे काॅलनीतील वृक्षतोडीवरून बरेच राजकारण झाले. आता, मेट्रो ७अ प्रकल्प आणि केंद्र सरकारच्या मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी २९० हून अधिक झाडे बाधित होत आहेत. ही झाडे तोडणे किंवा पुनर्रोपित करण्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाने सूचना आणि हरकती मागविल्या आहेत. १५ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना आपल्या सूचना पाठविता येणार आहेत.

प्रस्तावानुसार बुलेट ट्रेनसाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील १५२ झाडे बाधित होत आहेत. यापैकी ११ झाडे तोडली जाणार आहेत. तर, १४१ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. तर, मेट्रो प्रकल्पामुळे १३९ झाडे बाधित होणार आहेत. यापैकी ५५ झाडे तोडली जाणार आहेत. तर, ८५ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे.