Join us

सिम्युलेटर देणार बुलेट ट्रेन चालवण्याचे धडे; जपानी कंपनीशी २०१ कोटी रुपयांचा करार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 6:04 AM

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चालविण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी सिम्युलेटर्सची मदत घेतली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चालविण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी सिम्युलेटर्सची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा असलेल्या नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन (एनएचएसआरसीएल) यांनी मित्सुबिशी प्रीसिजन कंपनीशी २०१ कोटी रुपयांचा करार केला आहे. त्यानुसार १२ सिम्युलेटर्स  घेण्यात येणार आहेत. 

देशातील पहिल्यावहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या गुजरातमध्ये प्रगतिपथावर आहे. महाराष्ट्रातही या प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. २०२७ पर्यंत बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. एनएचएसआरसीएलने बुलेट ट्रेन चालविण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर एनएचएसआरसीएलने नुकतेच प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या सिम्युलेटरचे डिझाइन, उत्पादन, पुरवठा यासंदर्भात जपानस्थित मित्सुबिशी प्रीसिजन या कंपनीशी करार केला. बुलेट ट्रेनचे चालक, गार्ड, ट्रेनर आणि ट्रेन/रोलिंग स्टॉक मेंटेनन्स कर्मचाऱ्यांना या सिम्युलेटर मशीनमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. २०१ कोटी रुपयांचा हा करार असून १२ सिम्युलेटर्स मशीन असतील. सिम्युलेटर्सच्या पुरवठ्यासाठी २८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

या अत्याधुनिक सिम्युलेटर मशीनमुळे बुलेट ट्रेनचे ड्रायव्हिंग तत्त्व समजण्यास चालकांना आणि कर्मचाऱ्यांना मदत होईल. सिंगल ड्रायव्हर, सिंगल कंडक्टर तसेच ड्रायव्हर, कंडक्टर आणि डिस्पॅचर यांचे ग्रुप ट्रेनिंग एकाच वेळी घेणे शक्य होणार आहे. - सुषमा गौर, अपर महाव्यवस्थापक (जनसंपर्क), एनएचएसआरसीएल

सिम्युलेटर म्हणजे? 

- सिम्युलेटर हे एक यंत्र असून त्यात व्हिडीओ गेमप्रमाणे वाहन किंवा ट्रेन चालवण्याचा अनुभव घेता येतो. 

- एखाद्या रेल्वे गाडीप्रमाणेच स्टीअरिंग, स्पीडोमीटर, विविध बटणे, हॉर्न, साइड इंडिकेटर अशी सर्व रचना केलेली असते. 

- ट्रेनच्या काचेप्रमाणेच सिम्युलेटरमध्ये चालकासमोर काच असते. या काचेबाहेर रेल्वे मार्गावरील चित्र किंवा दृश्य निर्माण केली जातात. त्यामुळे सिम्युलेटरमध्ये बसलेल्या चालकाला बुलेट ट्रेन चालवण्याची अनुभूती प्राप्त होते.

टॅग्स :बुलेट ट्रेन