बुलेट ट्रेन प्रकल्पाचा डम्पर उलटला; वांद्रे पूर्वेतील घटनेत कामगार जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 13:33 IST2024-12-29T13:32:46+5:302024-12-29T13:33:01+5:30
याप्रकरणी कामगाराच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून बीकेसी पोलिसांनी चालक मनीष पांडे याच्यावर बुधवारी गुन्हा नोंदविला.

बुलेट ट्रेन प्रकल्पाचा डम्पर उलटला; वांद्रे पूर्वेतील घटनेत कामगार जखमी
मुंबई : बुलेट ट्रेन प्रकल्पातील डम्पर उलटून एक कामगार गंभीररित्या जखमी झाल्याची घटना वांद्रे पूर्वेत घडली आहे. याप्रकरणी कामगाराच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून बीकेसी पोलिसांनी चालक मनीष पांडे याच्यावर बुधवारी गुन्हा नोंदविला.
क्रारदार ब्रिजेश राजभर (२५) हे भोईवाडा येथील उमा ट्रान्सपोर्ट कंपनीत ऑपरेटर, तर त्यांचा भाऊ विजय हे हेल्पर आहेत. उमा ट्रान्सपोर्टला मेघा इंजिनिअरिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीकडून बीकेसी येथील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ठिकाणावरील माती वाहून नेण्याचे कंत्राट मिळाले आहे. चालक पांडे हा डम्परमध्ये भरलेली माती आणि दगड शिवडी येथे टाकण्याचे काम करतो.
ब्रिजेश यांच्या तक्रारीनुसार, विजय २१ डिसेंबरला रात्री कामावर गेला. त्याच दिवशी उत्तर रात्री २:२७ च्या सुमारास ब्रिजेश यांना अमित राजभर याने फोन करून विजयचा अपघात झाला असून, त्याला वांद्रे पूर्वेतील भाभा रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. ब्रिजेश रुग्णालयात गेले अपघातात विजयचे दोन्ही पाय, कंबर आणि पाठीला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
चालकावर गुन्हा
अधिक चौकशीत पांडे चालवत असलेला डम्पर डाव्या बाजूने उलटल्यामुळे हा अपघात घडल्याचे ब्रिजेश यांना समजले. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून बीकेसी पोलिसांनी पांडेविरोधात गुन्हा नोंदविला आहे.