बुलेट ट्रेनचा २१ किमीचा बोगदा घेणार आकार, तांत्रिक निविदा जाहीर, प्रकल्पाला गती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 07:26 AM2023-02-11T07:26:05+5:302023-02-11T07:26:47+5:30
मुंबईतील वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा दरम्यानच्या सी-२ पॅकेजसाठी एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि लार्सन अँड टुब्रो लिमिटेड यांच्याकडून दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत, असे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या प्रवक्त्याने सांगितले.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या मुंबई- अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामासाठी तांत्रिक निविदा गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. या २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्यापैकी सात किलोमीटरचा भाग समुद्राखाली असल्याची माहिती नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे आता मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळणार आहे.
मुंबईतील वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा दरम्यानच्या सी-२ पॅकेजसाठी एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि लार्सन अँड टुब्रो लिमिटेड यांच्याकडून दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत, असे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान, तांत्रिक मूल्यमापनानंतर आर्थिक निविदा उघडल्या जातील, असे प्रवक्त्याने सांगितले.
असे होणार काम -
- एनएचएसआरसीएल नुसार, जे महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नेतृत्व करत आहे, बोगदा जमिनीच्या खाली २५-४० मीटर खोलीपर्यंत १३.३ मीटर व्यासाचा एकल- ट्यूब ट्विन- ट्रॅक संरचना असेल.
- २०.३७ किलोमीटर लांबीपैकी, तीन टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) १५.४२ किलोमीटरची रचना तयार करतील, तर उर्वरित ४.९६ किलोमीटर लांबीचे काम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीनुसार केले जाणार आहे.