मुंबईच्या समुद्राखालून ७ किमी सुसाट धावणार बुलेट ट्रेन, ३ मजली स्टेशन अन् बरंच काही स्पेशल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 07:59 AM2023-02-15T07:59:10+5:302023-02-15T08:01:55+5:30
प्रथमच देशातील समुद्रातून सात किलोमीटर लांबीचा बोगदा निर्माण केला जात आहे. याची एकूण लांबी २१ किलोमीटर राहणार आहे.
संजय शर्मा
नवी दिल्ली : बुलेट ट्रेन म्हणजे सुसाट वेग... या वेगाचा थरार समुद्राच्या खालून अनुभवता येणार आहे. मुंबई-अहमदाबादबुलेट ट्रेन समुद्रातील सात किलोमीटर बोगद्यातून जाणार आहे. देशातील अशी ही पहिली रेल्वे असेल. बुलेट ट्रेनचे स्टेशन मुंबईच्या नैसर्गिक सागरी सौंदर्याने सजवले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला अद्भुत करण्यासाठी कोणतीही कमतरता ठेवली जाणार नाही. प्रथमच देशातील समुद्रातून सात किलोमीटर लांबीचा बोगदा निर्माण केला जात आहे. याची एकूण लांबी २१ किलोमीटर राहणार आहे.
एवढेच नव्हे तर बुलेट ट्रेनच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, विरार, ठाणे व बोईसर या स्थानकांना अशा पद्धतीने तयार केले जात आहे की, समुद्र, लाटा, हवा,
मच्छीमारांचे जाळे व नैसर्गिक समुद्र त्यातून सहजपणे पाहिले जाऊ शकतात. या संपूर्ण प्रकल्पाचे काम खूपच मंदगतीने सुरू होते; परंतु शिंदे सरकार सत्तेवर येताच या प्रकल्पाला गती आली. २०२६पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाचे एक ते दोन टप्पे २०२४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू होण्याची शक्यता आहे.
समुद्रात तीन मजली स्टेशन
n या सर्वांत अनोखे बुलेट ट्रेन स्टेशन बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बीकेसी असेल. हे देशातील समुद्रात तयार केलेले पहिले तीन मजली स्टेशन असेल. जमिनीच्या खाली २४ मीटरपर्यंत तयार होणारे स्टेशन सर्व सुविधांनी युक्त असेल.
n एका मजल्यावर प्लॅटफॉर्म, दुसऱ्यावर प्रवासी सुविधा-तिकीट, वेटिंग लाऊंज, नर्सरी, रेस्ट रूम, स्मोकिंग रूम, माहिती केंद्र, रिटेल दुकाने, उद्घोषणा केंद्र असेल; तर अन्य मजल्यांवर स्टेशन सर्व्हिसिंग असेल.
n या स्टेशनला दोन प्रवेशद्वार व दोन एक्झिट द्वार असतील. एक मेट्रो स्टेशनजवळ तर दुसरे एमटीएनएल बिल्डिंगजवळ असेल. हे स्टेशन बस, टॅक्सी, ऑटोने जोडून मोठे वाहतूक हब बनवले जाईल. ढगांच्या डिझाइनवर हे स्टेशन असेल.
संपूर्ण रेल्वेमार्गावर बुलेट ट्रेन १२ स्टेशनवर थांबणार आहे. यात बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, ठाणे, विरार व बोईसर ही चार स्टेशन महाराष्ट्रात असतील.
गुजरातेत वापी, बिलिमोरी, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद व साबरमती हे आठ स्टेशन असतील.
आजवर या प्रकल्पासाठी ९८.८८% जमिनीचे अधिग्रहण. महाराष्ट्रात ९८.७९%, गुजरातेत ९८.९१% व दादरा-नगर हवेलीत १००% जमिनीचे अधिग्रहण झालेले आहे.
पर्वतातील वेगवान वारे
विरार स्टेशनचे डिझाइन पर्वतांमधून येणाऱ्या वेगवान हवेच्या रूपात दर्शविले आहे. विरार स्टेशनही पर्वतावर आहे आणि त्याचे डिझाइनही पर्वत व पर्वतातून येणाऱ्या वेगवान हवेच्या रूपात दर्शविले आहे.
लाटांच्या धर्तीवर डिझाइन
ठाणे स्टेशन उल्हास नदीजवळ होणार असून, या स्टेशनचे डिझाइन पूर्णपणे समुद्रातील लाटांच्या धर्तीवर तयार केले आहे. स्टेशनचे छत व प्रवेशद्वार समुद्रातील लाटांप्रमाणे तयार केले आहे.
माशांच्या जाळ्यासारखे डिझाइन
बोईसर स्टेशन हे महाराष्ट्रातील शेवटचे स्टेशन असेल. किनारपट्टी भाग असल्यामुळे येथे मासेमारी मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे मासे पकडण्याच्या जाळ्यासारखे डिझाइन तयार केले आहे.