बुलेट ट्रेनचे जाळे विणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 01:41 AM2018-04-12T01:41:54+5:302018-04-12T02:09:51+5:30
‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात पीयूष गोयल यांना ‘पॉलिटिशियन आॅफ द इयर’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार दीबांग यांनी घेतलेल्या मुलाखतीत गोयल यांनी रेल्वे संदर्भातील योजना मांडल्या.
मुंबई : ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात पीयूष गोयल यांना ‘पॉलिटिशियन आॅफ द इयर’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार दीबांग यांनी घेतलेल्या मुलाखतीत गोयल यांनी रेल्वे संदर्भातील योजना मांडल्या.
आपल्या देशात सर्वाधिक जलद गाडी १९६९ मध्ये ‘राजधानी’ च्या रुपात आली. त्यानंतर आतापर्यंत इतक्या वर्षात भारतीयांना आधुनिक तंत्रज्ञानापासून दूर ठेवण्यात आले. बुलेट ट्रेनचे जाळे विस्तारल्यानंतर सध्याच्या सामान्य रेल्वेमार्गावर येणारा भार कमी होईल. त्यामुळे सध्याचे रेल्वेमार्ग सामान व वस्तूंच्या जलद दळणवळणासाठी उपयोगात आणता येतील, असे गोयल म्हणाले. बुलेट ट्रेनच्या जमीन संपादनाला स्थानिकांचा विरोध आहे, या प्रश्नाबाबत गोयल यांनी, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठीचे भूसंपादन जगात सर्वात कमी असल्याचा दावा केला. भूसंपादनावर महाराष्ट्र व गुजरात सरकार सामंजस्याने तोडगा काढतील. शेतकऱ्यांच्या जमिनीला चार पट अधिक दर याद्वारे मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.
भारतीय रेल्वे अद्यापही असुरक्षित, गाड्या कधीच वेळेत न येणाºया, सामान एका जागेहून दुसºया ठिकाणी वेळेत न पोहोचणारी मानली जाते. या प्रश्नाबाबत गोयल यांनी, सध्या सुरू असलेल्या कामांमुळे भारतीय रेल्वे होईल जगात सर्वोत्तम होईल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, रेल्वेमार्गांच्या नुतनीकरणाच्या कामांची सरासरी याआधी महिन्याला २३३ किमी होती. मात्र आता ती ६५० किमीवर पोहोचली आहे. रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी जागोजागी मेगाब्लॉकद्वारे विविध कामे केली जात आहेत. या कामांचा सध्या त्रास असला तरी मार्च २०१९ पर्यंत ही सर्व कामे पूर्ण केली जातील. त्यानंतर भारतीय रेल्वे वेळापत्रकानुसार तंतोतंत वेळेत व पूर्णपणे सुरक्षितपणे धावेल. सामानाच्या दळणवळणात शेती उत्पादनांना प्राधान्य दिले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिग्नलिंग यंत्रणेचे ७४ हजार कोटी रुपयांचे कंत्राट रद्द केल्याचे वृत्त गोयल यांनी यावेळी फेटाळले. ती सिग्नल यंत्रणा ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत देशात तयार होत आहे. त्यामुळे कमी खर्चात आपल्याच देशातील कंपनीला हे कंत्राट देता येईल का, याचा विचार करण्याची सूचना पंतप्रधानांनी केली आहे. रेल्वेला कमी खर्चाच्या कंत्राटाद्वारे सामग्री मिळावी. जेणेकरुन वाढत्या दराचा प्रवाशांवर बोजा पडणार नाही, असा प्रयत्न सरकारने सुरू केला आहे. यासाठी कंत्राट देण्याची जुनी यंत्रणा बदलली जात आहे. त्याचे स्वागत करायला हवे, असे गोयल म्हणाले.
पीयूष गोयल हे भाजपचे मुख्य खजिनदारही आहेत. त्यांच्या कार्यकाळात पक्षाच्या तिजोरीत ८१ टक्के वाढ झाली. हे कसे काय शक्य झाले? असा प्रश्न दीबांग यांनी उपस्थित केला. त्यावेळी, हे तर मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे शक्य झाले आहे. भारतीयांचा भाजपवरील विश्वास वाढत असल्यानेच भरघोस देणगी येत आहे. पण या सर्व देणग्यांची माहिती वेबसाइटवर जाहीर आहे, असे ते म्हणाले. या वाढत्या लोकप्रियतेमुळेच २०१९ मध्ये भाजप स्वत: ३०० हून अधिक जागा जिंकेल. मित्रपक्षांसह दोन तृतीअंश जागा एनडीएच्या असतील व पुन्हा भाजपचेच सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.बुलेट ट्रेन हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. भविष्याची गरज ओळखून हे तंत्रज्ञान भारतात आणले जात आहे. जलद प्रवासी वाहतुकीसाठी या ट्रेनशिवाय पर्याय नाही. त्यामुळे देशात बुलेट ट्रेनचे जाळे विणले जाईल, अशी ग्वाही रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.
>३४ हजार कोटी खर्च हास्यास्पद
आगामी लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांकडून ३४ हजार कोटी रुपये खर्च होतील, असा अंदाज हास्यास्पद आहे. या खर्चानुसार प्रत्येक उमेदवार ८० कोटी खर्च करेल. तसे झाल्यास देशाची अर्थव्यवस्था हादरून जाईल. त्यामुळे या वृत्तावर विश्वास ठेऊ नका, असे ते म्हणाले.
>जनतेच्या प्रेमाचा गौरव
देशातील पत्रकारितेत लोकमतने प्रमुख स्थान ग्रहण केले आहे. माझ्या आयुष्यात माझी आई चंद्रकांता गोयल आणि पत्नी सीमा गोयल यांचे विशेष योगदान आहे. आईने मला जीवनात यशस्वी होण्यासाठी राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोन दिला. मी यशस्वी होण्यासाठी माझ्यापेक्षा जास्त त्याग माझ्या पत्नीने केला आहे. सामाजिक आयुष्य जगत असताना तिने दिलेले योगदान अनमोल आहे. विजयजी, राजेंद्रजी आणि मला भावासारखे असणारे देवेंद्र आणि ऋषी यांच्यासह सर्व ज्यूरी मंडळाचे आभार. महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या प्रेमाचा हा गौरव आहे.
- पीयूष गोयल,
रेल्वे आणि कोळसा मंत्री
>अक्षयकुमारचे कौतुक
‘टॉयलेट एक प्रेमकथा’ व ‘पॅडमॅन’ या चित्रपटांद्वारे अक्षयकुमारने भारतीयांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकला आहे, असे सांगत पियूष गोयल यांनी यावेळी उपस्थित असलेला अभिनेता अक्षयकुमारचे कौतुक केले. ‘पॅडमॅन’नंतरच आम्ही देशातील ८ हजार रेल्वे स्थानकांवर ‘नॅपकिन वेंडिंग मशीन’ लावण्याचा निर्णय घेतला. स्त्रीयांना तेथे स्वस्त दरात नॅपकिन उपलब्ध करुन दिले जातील. तसेच या स्टेशन्सवरील सार्वजनिक शौचालये स्वच्छ ठेवले जातील, असे गोयल यांनी सांगितले.