डीएफसीसी मार्गावरून बुलेट ट्रेनचे काम सुसाट; १०० मीटर लांबीचा ‘मेक इन इंडिया’ स्टील पूल पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 06:27 IST2025-02-10T06:26:50+5:302025-02-10T06:27:16+5:30
मुंबई- अहमदाबाददरम्यान ५०८ किमीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. यामध्ये अनेक नदी पूल आणि रेल्वे ओलांडणी पूल आहेत

डीएफसीसी मार्गावरून बुलेट ट्रेनचे काम सुसाट; १०० मीटर लांबीचा ‘मेक इन इंडिया’ स्टील पूल पूर्ण
मुंबई - मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सुरतमध्ये १०० मीटर लांबीच्या ‘मेक इन इंडिया’ स्टील पुलाची उभारणी पूर्ण झाली आहे. गुजरातमधील नियोजित १७ पुलांपैकी हा सहावा स्टील पूल आहे. पश्चिम रेल्वे आणि डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशनच्या (डीएफसीसी) चार मार्गिका असलेल्या ठिकाणी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने हा पूल यशस्वीरीत्या उभारला आहे.
मुंबई- अहमदाबाददरम्यान ५०८ किमीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. यामध्ये अनेक नदी पूल आणि रेल्वे ओलांडणी पूल आहेत. सुरतमध्ये उभारण्यात आलेला स्टीलचा पूल रेल्वे रुळांपासून १४.५ मीटर उंचीवर उभारण्यात आला आहे. गुजरातमधल्या भूज येथील कारखान्यात हा १,४३२ मेट्रिक टन वजनाचा १०० मीटर लांबीचा, १४.३ मीटर रुंदीचा हा स्टीलचा पूल तयार करण्यात आला आहे. पुलाच्या उभारणीकरिता पश्चिम रेल्वे आणि डीएफसीसी या दोन्ही रेल्वे मार्गांवर वाहतूक ब्लॉक घेण्यात आला होता.
पाच स्टील पूल उभारले..
या अगोदर सुरत, आणंद, बडोदा (मुंबई द्रुतगती मार्ग), सिल्वासा (दादरा आणि नगर हवेली) आणि बडोदा येथे अनुक्रमे ७० मीटर, १०० मीटर, २३० मीटर, १०० मीटर आणि ६० मीटर लांबीचे पाच स्टील पूल उभारण्यात आले आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन ५०८ किमीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची
११ टप्प्यांत विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये ४६५ किमी लांबीचे व्हायाडक्ट (लांबलचक पूल), १२ स्थानके, १० किमी लांबीचे २८ स्टील पूल, २४ नदी पूल, ९७ किमी लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार आहे.