मुंबई : मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांना जोडणारा बहुचर्चित अशा बुलेट ट्रेनच्या कामाला रेल्वे मंत्रालयाने आखलेल्या मुदतीतच सुरु होणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. २0१८ सालापासून प्रकल्पाचे काम सुरु करुन ते २0२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. रेल्वे बोर्डाचे सदस्य मोहम्मद जमशेद हे आॅक्टोबर २0१६ मध्ये मुंबईत आले होते. त्यावेळी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या प्राथमिक स्तरावरील कामांना २0१७ पासून सुरुवात केली जाईल,अशी माहिती त्यांनी दिली होती. जवळपास ९७ हजार कोटी रुपये किंमत असलेल्या या प्रकल्पात १२ स्थानके असून चार महाराष्ट्रातील आणि आठ गुजरामधील स्थानकांचा समावेश आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे अंतर हे ५0८ किलोमीटर एवढे आहे. हा प्रकल्प झाल्यास ताशी ३२0 ते ३५0 किलोमीटर वेगाने ट्रेन धावेल. त्यामुळे दोन ते अडीच तासांत ट्रेन अंतर कापेल. सध्या याच मार्गावरुन प्रवास करण्यास सात ते आठ तास लागतात. मुंबईत या प्रकल्पाचे पहिले स्टेशन हे मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे असेल आणि ते भूमिगत असणार आहे. परंतु एमएमआरडीएच्या जागेत हे काम चालणार असल्याने त्यावरुन सध्या वाद सुरु आहे. (प्रतिनिधी)
बुलेट ट्रेनचे काम २0१८ पासून सुरू
By admin | Published: April 17, 2017 3:18 AM