Join us

बुलेट ट्रेनची कामे सुसाट! एनएचएसआरसीएलच्या एमडींकडून पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 11:54 AM

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून त्याअंतर्गत वांद्रे-कुर्ला संकुलातील कामालाही सुरुवात झाली आहे.

मुंबई :

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून त्याअंतर्गत वांद्रे-कुर्ला संकुलातील कामालाही सुरुवात झाली आहे. या कामात पायाभरणीच्या कामासह मातीचे परीक्षण आदी कामांचा समावेश आहे, अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनकडून देण्यात आली. 

नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक विवेककुमार गुप्ता यांनीही नुकतेच बुलेट ट्रेनच्या कामाची पाहणी केली. ठाणे रोलिंग स्टॉक डेपो आणि उल्हास ब्रिज स्थळावरील कामांच्या पाहणीचा यात समावेश होता. प्रकल्पस्थळांच्या कामाची पाहणी करताना विवेककुमार यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत आतापर्यंत झालेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.

मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानचा प्रवास वेळ मर्यादित थांब्यांसह दोन तासांचा असेल. जेव्हा ट्रेन सर्व थांब्यांवर थांबेल तेव्हा अंदाजे २.५ तास असेल. त्यामुळे बराच वेळ वाचणार आहे.

 ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत प्रकल्पस्थळी माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्यात बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या जमिनीवरील बांधकामास सुरुवात झाली आहे. शिळफाटा ते झरोली गावापर्यंत हे काम सुरू आहे. बीकेसी ते शिळफाटादरम्यानच्या २१ किमी बोगद्यापैकी समुद्राखालून जाणाऱ्या ७ किमी लांबीच्या बोगद्याचे काम सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन स्टेशनचे कामही प्रगतिपथावर आहे. मुंबई, ठाणे, वापी, सुरत, वडोदरा, आनंद आणि अहमदाबादला प्रकल्पामुळे फायदा होईल. नोव्हेंबर २०२१ मध्ये काम सुरू झाले. बुलेट ट्रेनसाठी एकूण २१ किलोमीटर लांबीच्या भूयारी मार्गाचे काम केले जाईल. ७ किलोमीटर लांबीचा मार्ग हा समुद्राखालून जातो.

टॅग्स :बुलेट ट्रेनमुंबई