बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानकाला मुहूर्त मिळाला जपानच्या शिंकानसेन डेपो आधारित रचना, निविदा मागविल्या

By नारायण जाधव | Published: December 23, 2022 08:53 PM2022-12-23T20:53:18+5:302022-12-23T22:09:18+5:30

मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील ठाणे स्थानकाच्या बांधकामासाठी नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनने अखेर बुधवारी निविदा मागविल्या आहेत.

Bullet Train's Thane Station Gets Muhurat Design Based on Japanese Shinkansen Depot, Tenders Invited | बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानकाला मुहूर्त मिळाला जपानच्या शिंकानसेन डेपो आधारित रचना, निविदा मागविल्या

बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानकाला मुहूर्त मिळाला जपानच्या शिंकानसेन डेपो आधारित रचना, निविदा मागविल्या

googlenewsNext

नवी मुंबई : मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील ठाणे स्थानकाच्या बांधकामासाठी नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनने अखेर बुधवारी निविदा मागविल्या आहेत. जपानच्या शिंकानसेन डेपोवर आधारित या स्थानकाची रचना राहणार असल्याची माहिती कार्पोरेशनच्या जनसंपर्क अधिकारी सुषमा गौर यांनी ‘लोकमत’ला दिली. ठाण्यात २२ हेक्टर जागा यासाठी संपादित केली आहे.
या निविदेमध्ये स्थानकाचे डिझाइन, स्थानकाचे बांधकाम, इन्स्पेक्शन शेड्स, मेंटेनन्स डेपो आणि इन्स्टॉलेशन, टेस्टिंगसह संबंधित कामांचा समावेश आहे.

राज्यातून बुलेट ट्रेनचा मार्ग हा १५६ किलोमीटर एवढा आहे. यापैकी ठाणे शीळफाटा ते झारोळी या ३५ किलोमीटर मार्गाच्या कामासाठी यापूर्वीच निविदा काढल्या आहेत. या मार्गावर ११ नद्यांवरील पूल आणि सहा बोगद्यांचा समावेश आहे. गेल्याच महिन्यात बुलेट ट्रेनच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या २२ हजार खारफुटींची कत्तल करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती.

२२ हेक्टर जागेचे संपादन

बुलेट ट्रेनसाठी ठाण्यातील २२ हेक्टर जागेचे संपादन केले आहे. यात खासगी मालकीची जमीन १८ हेक्टर आठ आर ८१ चौ. मीटर, मध्य रेल्वेच्या मालकीची ४२ आर ३९ चौ. मीटर, राज्य शासनाच्या मालकीची दोन हेक्टर ३२ आर १० चौ. मीटर, खासगी मालकीची सहा हेक्टर, ४८ आर, २१ चौ. मीटर जमिनीचा समावेश आहे. त्यासाठी मौजे आगासन, म्हातार्डी, बेतवडे, डावले, पडले, शीळ व देसाई आदी ठिकाणचे अतिक्रमण काढले आहे.

ठाणे खाडीखालून २१ किमीचा भुयारी मार्ग

बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स येथील भुयारी स्थानकासह बीकेसी ते शिळफाटा दरम्यान २१ किलोमीटर लांबीचा भुयारी मार्गासाठी यापूर्वी निविदा मागविलेल्या आहेत. हा भुयारी मार्ग ठाणे खाडीखालून नवी मुंबईच्या घणसोली- कोपरखैरणेतून जाणार आहे. तसेच शीळफाटा येथील वाहतूककोंडी टाळण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांची रचनाही बुलेट ट्रेन मार्गासाठी बदलली आहे.

Web Title: Bullet Train's Thane Station Gets Muhurat Design Based on Japanese Shinkansen Depot, Tenders Invited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई