गौरीशंकर घाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी आरक्षण मर्यादा आणि राज्यसभेतील गदारोळाच्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली. नेहमीप्रमाणे राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया पेजवरून या परिषदेचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. परंतु, या प्रक्षेपणात ''बैलगाडा शर्यत'' सुरू करण्याची मागणी करत नेटकऱ्यांनी अक्षरशः प्रतिक्रियांचा पाऊस पाडला.
पवार आरक्षणासह अन्य विषयावर भाष्य करत असताना बैलगाडा शर्यतीसाठी सुरू असलेल्या या ऑनलाइन प्रतिक्रियांचा जोरदार मारा सुरू होता. त्यामुळे काही प्रेक्षक बुचकाळ्यात पडले होते. त्यातील काहींनी हा काय प्रकार आहे, अशी विचारणाही केली. राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याची मागणीने सध्या जोर धरला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील, शेतकी पार्श्वभूमी असलेले लोक सोशल मीडियात हा विषय मांडत आहेत. अनेक नेत्यांच्या पोस्टवर शर्यत सुरू करण्याची मागणी करणारे पोस्ट केले जात आहेत. या मागणीला राजकीय रंगही चढत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर या नेत्यांनी बैलगाडा शर्यत सुरू करण्याची जाहीर मागणीही केली आहे. तर, पंधरा दिवसांत शर्यत सुरू करण्याचा निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही काही गावकऱ्यांनी दिला आहे. सोशल मीडियावर बैलगाडा शर्यतीची मागणी लावून धरणारे विविध पेजही सुरू करण्यात आले आहेत. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हा विषय जिव्हाळ्याचा बनत असल्याचे चित्र आहे.
सोशल मीडियावर केलेल्य मागण्या
‘साहेब, बैलगाडा शर्यत सुरू करा, शर्यत सुरू नाही झाली तर पाच वर्षांत खिलार जात संपून जाईल’, पेटावर बंदी आणा, बाहेरच्या देशातील पेटा नावाची संस्था आपल्यावर राज्य करत आहे, बैलगाडा शर्यत ही आपली ग्रामीण संस्कृती आहे, शर्यतीला ४०० वर्षांचा इतिहास आहे, शर्यतीवरील बंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे, जंगली प्राण्यांच्या यादीतून बैलाला वगळा, देशी गोवंशाच्या जतन-संवर्धनासाठी शर्यत सुरू झालीच पाहिजे, आपणच शेतकऱ्यांचे वाली आहात-शर्यत सुरू करायला लावा, पेटा हलवा-बैल वाचवा, साहेबांनी लक्षं घातल्यास आठ दिवसात बंदी उठेल... असे शेकड्याने प्रतिक्रिया येऊ लागल्या.