मीरारोडमध्ये फेरीवाल्यांची गुंडगिरी; फेरीवाल्यांच्या म्होरक्यासह २५-३० जणांवर गुन्हा, दुकानदारांचा बंद

By धीरज परब | Published: October 23, 2023 09:03 PM2023-10-23T21:03:20+5:302023-10-23T21:04:20+5:30

लोकांच्या संतापानंतर महापालिकेला कारवाईची जाग

Bullying of hawkers in Mira Road Crime against 25-30 persons including the leader of the hawkers | मीरारोडमध्ये फेरीवाल्यांची गुंडगिरी; फेरीवाल्यांच्या म्होरक्यासह २५-३० जणांवर गुन्हा, दुकानदारांचा बंद

मीरारोडमध्ये फेरीवाल्यांची गुंडगिरी; फेरीवाल्यांच्या म्होरक्यासह २५-३० जणांवर गुन्हा, दुकानदारांचा बंद

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरारोडच्या शांती नगर मध्ये अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांच्या दादागिरी व गुंडगिरी ने रहिवाशी , दुकानदार त्रासले असताना रविवारी रात्री एका ६० वर्षीय दुकानदारास मारहाण केल्या प्रकरणी २५ ते ३० फेरीवाल्यांवर नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . या  घटनेने संतप्त दुकानदारांनी बंद पुकारला तर रहिवाश्यांनी तत्कालीन नगरसेवक आणि महापालिकेच्या हप्तेखोरीमुळे फेरीवाले प्रचंड वाढून गुंडगिरी होत असल्याचा आरोप केला . पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला तर पालिकेने फेरीवाल्यांचे शेड आदी तोडण्यास सुरवात केली.

शांती नगर सेक्टर १ , इमारत क्र . ५९ मध्ये दुकान ५ व ६ मध्ये मायरी नावाचे गुमानसिंग राजपुरोहीत ( ६० ) यांचे दुकान आहे . दुकान समोर त्यांनी त्यांची दुचाकी उभी केली होती . रविवारी रात्री ११ च्या सुमारास एका फेरीवाल्याने त्याची दुचाकी काढताना राजपुरोहित यांच्या दुचाकीचे सीट कव्हर फाटल्याने त्यांनी हळू गाडी काढ असे फेरीवाल्यास सांगितले . त्याचा राग येऊन अशीच गाडी लावेन सांगून आरडाओरडा व शिवीगाळ सुरु केली . त्यासरशी अन्य फेरीवाले धावून आले.

फेरीवाल्यांची राजपुरोहित व त्यांचा कर्मचारी करणसिंग ह्या दोघांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली . या घटनेने संतप्त दुकानदार, काही नागरिक पोलीस ठाण्यात दाखल झाले .  आमदार गीता जैन पहाटे २  च्या सुमारास पोहचल्या नंतर पोलिसांनी हल्लेखोर अजहर हैदर शेख, झोएब अल्ताफ शेख व अन्नान मोहमद सुतार, राजपुरोहित यांच्या दुकान समोर बाकडे लावणारे दोघे आणि इत्तर  २० ते २५ फेरीवाल्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सोमवारी घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी या  भागात पोलिसांसह एआरपीची तुकडी तैनात केली . परिसरात तणावपूर्ण शांतता होती . दुकानदारांनी बंद पाळून निषेध व्यक्त केला . आ . जैन यांनी पालिका आयुक्त संजय काटकर , उपायुक्त अतिक्रमण मारुती गायकवाड व पोलिसांसह शांती नगर मध्ये जाऊन रहिवाशी आणि दुकानदार यांचे म्हणणे ऐकले.

यावेळी काही रहिवाशी आणि दुकानदारांनी महापालिका, पोलीस तसेच तत्कालीन अनेक नगरसेवकां बद्दल भ्रष्टाचाराचे आरोप करत यांच्या हप्तेखोरी मुळेच शांती नगर मध्ये फेरीवाल्यांनी रस्ते , पदपथ व मोकळ्या जागांवर बस्तान मांडले . सोसायटीचे प्रवेश द्वार सुद्धा सोडले नाहीत. गेल्या अनेक वर्षां पासून तक्रारी करून सुद्धा ठोस कारवाई हो नसल्याने फेरीवाले मुजोर होऊन त्यांची गुंडगिरी अनेक वर्षां पासून रहिवाशी सहन करत असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले . गुंडगिरी , चोऱ्या , महिला - मुलींची छेडछाड सारखे प्रकार होऊन सुद्धा कोणी गांभीर्याने घेतले नाही असे आरोप लोकांनी केले.

या घटनेनंतर महापालिकेने फेरीवाल्यांचे शेड , बाकडे आदी अतिक्रमणे जेसीबी व मजुरांच्या सहाय्याने काढण्यास सुरवात केली . परंतु हि कारवाई केवळ दिखाव्या पुरती नको.  पालिका पथक येणार याची माहिती फेरीवाल्यांना आधीच मिळते. पथक आले तर थातुरमातुर कारवाई करून निघून जाते असे लोकं म्हणाले.

Web Title: Bullying of hawkers in Mira Road Crime against 25-30 persons including the leader of the hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.