नवी दिल्ली - सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून कमालीच्या आक्रमक झालेल्या आणि बॉलिवूडमधील नेपोटिझम आणि ड्र्रग्स रॅकेटवर टीका करणाऱ्या कंगना राणौत हिने बॉलिवूडला पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. बॉलिवूड इंडस्ट्री ही ड्रग्स, नेपोटिझम आणि शोषणाचे गटार झाले आहे, अशी टीका कंगनाने केली आहे.एकापाठोपाठ एक ट्विट करत कंगानाने बॉलिवूडवर हल्लाबोल केला आहे. बॉलिव़ूड ड्रग्स, शोषण, नोपोटिझम आणि जिहादचे गटार बनले आहे. मात्र त्याला साफ करण्याऐवजी बॉलिवूड स्ट्राइक्स बॅकसारख्या हॅशटॅगचा वापर केला जात आहे. मी तर म्हणते माझ्यावरही खटला दाखल करा. जोपर्यंत जिवंत राहीन तोपर्यंत तुम्हा सगळ्यांचं पितळ उघडं पाडत राहीन, असं कंगना म्हणाली.
पुढच्या ट्विटमध्ये कंगना म्हणाली की, मोठमोठे स्टार केवळ महिलांना ऑब्जेक्टिफाय करत नाहीत तर तरुण मुलींचे शोषणही करतात. ते सुशांतसिंह राजपूतसारख्या तरुण अभिनेत्यांना पुढे येऊ देत नाहीत. ते वयाच्या ५० व्या वर्षी शाळेतील मुलांची भूमिका करू इच्छितात. जर त्यांच्यासमोर काही चुकीचे घडले तरी ते कुणासाठी व्यक्त होत नाहीत.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून कंगना राणौतनेमुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारवरही बोचरी टीका केली होती. कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करत तिने शिवसेनेशीही पंगा घेतला होता. मुंबईची तुलना पीओकेशी केली होती. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती. त्यामुळे एका नव्या वादास तोंड फुटले होते.