मुंबई : माहिती अधिकाराखाली प्राप्त झालेली माहिती आणि त्यानंतरच्या तक्रारींची दखल घेत तीन कंत्राटदारांकडून १ लाख ८५ हजार रुपये परत मिळवण्यात मुंबई महापालिकेला यश आले. तर माहितीच्या अधिकार कायद्याचा वापर करून, मिळालेले माहितीचे अभ्यासपूर्ण आकलन करून आजपर्यंत १७ लाख ८५ हजार रुपये मुंबई महापालिकेला परत मिळाले आहेत.
अखिल भारतीय माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुश कुराडे यांनी महापालिकेच्या इमारत परिरक्षण विभागाकडे आजमितीस झालेल्या कामाची सविस्तर माहिती मागितली होती. प्राप्त माहितीचे आकलन आणि प्रत्यक्ष जागेवर झालेल्या कामाचे निरीक्षण यामध्ये कुराडे यांना तफावत दिसून आली. त्यानंतर झालेल्या कारवाईत हा परतावा मिळाला.
इमारत परिरक्षण विभागाचे दुर्लक्ष आणि दक्षता विभागाच्या निष्काळजीपणामुळे कंत्राटदाराने प्रत्यक्षात काम न करता, केवळ कागदोपत्री काम केल्याचे दाखवून, कामाची बिले मंजूर करून घेतली. महापालिकेने झालेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करणे गरजेचे होते. मात्र यातही निष्काळजीपणा झाला. परिणामी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांकडे लेखी तक्रार करण्यात आली.
गैरप्रकार झाल्याचे उघडकीसतक्रारीच्या पाठपुराव्यानंतर आणि चौकशीअंती गैरप्रकार झाल्याचे तपास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, अशाच अनेक प्रकरणांची दखल घेत त्या कामाची सखोल चौकशी केल्यास पालिकेला ५० लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो, असे अखिल भारतीय माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाचे म्हणणे आहे.