बंबार्डियरवर ‘पिचकाऱ्या’
By admin | Published: March 21, 2015 12:50 AM2015-03-21T00:50:49+5:302015-03-21T00:50:49+5:30
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेल्या या लोकलच्या बाबतीत काही प्रवाशांकडूनच गैरवर्तणुकीचे दर्शन घडविण्यात आले आहे
मुंबई : नव्या बंबार्डियर लोकल प्रवाशांच्या ताफ्यात येणार कधी, असा सवाल लोकप्रतिनिधी आणि प्रवाशांकडून उपस्थित केला जात असतानाच पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेल्या या लोकलच्या बाबतीत काही प्रवाशांकडूनच गैरवर्तणुकीचे दर्शन घडविण्यात आले आहे. नव्याकोऱ्या अशा बंबार्डियर लोकलवर प्रवाशांनी पान खाऊन पिचकाऱ्यांचा मारा करून या लोकलचे सर्व चित्रच पालटून टाकल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रवाशांची ही गैरवर्तणूक थांबणार कधी, असा प्रश्न रेल्वे अधिकाऱ्यांना पडला आहे.
दीड वर्षापूर्वी पश्चिम रेल्वेकडे दोन बंबार्डियर लोकल दाखल झाल्या. या लोकलच्या चाचण्या घेण्यात आल्यानंतर रेल्वे बोर्डाकडून या लोकल चालविण्याची मंजुरी देण्यात आली आणि १५ मार्च रोजी दोनपैकी एक लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आली. तर दुसरी लोकल १९ मार्चपासून ताफ्यात दाखल झाली. चर्चगेट ते अंधेरी, बोरीवली आणि विरारसाठी या दोन्ही लोकल धिम्या मार्गावर चालविण्यात येत आहेत. या लोकल दाखल होताच प्रवाशांच्या पसंतीसही उतरल्या आणि त्याचे स्वागतही करण्यात आले. बंबार्डियर क्लासमधील ७0 नवीन लोकल २0१६ पर्यंत टप्प्याटप्प्यात दाखल होणार आहेत. यातील दोन लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होताच काही प्रवाशांनी मात्र आपल्या गैरवर्तणुकीचे दर्शन दिले आहे. या लोकलच्या काही डब्यांवर प्रवाशांनी पान खाऊन पिचकाऱ्यांचा माराच केला आहे. मालडबा, सेकंड क्लास डब्यांच्या दरवाजावर तसेच खिडक्यांवर पान खाऊन थुंकण्यात आल्याने या लोकलचे रूप पूर्णपणे पालटले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पान खाऊन प्रवासी थुंकल्यास त्याचे डाग स्पष्टपणे दिसू नये यासाठी लोकलच्या डब्यांना गडद गुलाबी रंग लावण्यात आला आहे. मात्र हा रंग लावूनही त्याचा जराही फायदा झाला नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. याबाबत रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रवाशांनीच आपली वर्तणूक सुधारली तर अशी वेळ येणार नाही. मुळात डब्यांवर थुंकल्यानंतर त्याच्या सफाईचा मोठा मनस्ताप रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना सोसावा लागतो. (प्र्रतिनिधी)
च्या बंबार्डियर लोकलच्या काही डब्यांवर प्रवाशांनी पान खाऊन पिचकाऱ्यांचा माराच केला आहे. मालडबा, सेकंड क्लास डब्यांच्या दरवाजावर तसेच खिडक्यांवर पान खाऊन थुंकण्यात आल्याने या लोकलचे रूप पूर्णपणे पालटले आहे. डाग स्पष्टपणे दिसू नये यासाठी लोकलच्या डब्यांना गडद गुलाबी रंग लावूनही त्याचा जराही फायदा झाला नसल्याचे दिसते.