तेजस वाघमारे, मुंबईशिवडी येथील इमारतीच्या पुनर्विकासासाठी म्हाडाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेऊन रहिवाशांना वेठीस धरणाऱ्या एका बिल्डरला म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने दणका दिला आहे. रहिवासी आणि म्हाडा अधिकाऱ्यांना दाद न देणाऱ्या बिल्डरला इमारत पुनर्विकासासाठी देण्यात आलेली एनओसी तातडीने रद्द करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. म्हाडाच्या या निर्णयामुळे सेसप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी एनओसी घेऊनही कामात दिरंगाई करणाऱ्या बिल्डरांचे धाबे दणाणले आहे.परळ शिवडी विभागातील टोकरजी जीवराज मार्गावरील इमारत क्रमांक १४, १४ ए, १६-१६ ई, १८, १२ एच, १२ जे, १२ सी, १२ एफ, १२ के, १२ इ, १२ एल, १२ डी, १२ सी, १२ बी, १२ ए आणि १२ क्रमांकांच्या इमारती द रावसाहेब रावजी सोजपाल आणि मातोश्री कंबुबाई रावजी चॉरिटेबल ट्रस्टच्या आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी ट्रस्टने बिल्डर म्हणून म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून २00४ मध्ये ना हरकत प्रमाणपत्र मिळवल्याचे, म्हाडा अधिकाऱ्यांनी सांगितले. एनओसी घेऊन २0१५ साल उजाडले तरी इमारतींचा पुनर्विकास होत नसल्याने रहिवासी संतप्त झाले होते.इमातींमधील रहिवासी दहा वर्षे म्हाडा कार्यालयात खेटे घालून थकले. मात्र, इमारत बांधकामाची एक वीटही रचली गेली नाही. अखेर रहिवाशांनी पुनर्विकासासाठी म्हाडाकडे तगादा लावला. त्यानुसार म्हाडाने बिल्डर आणि नागरिकांची बैठक बोलाविली. परंतु या बैठकींकडेही बिल्डर पाठ फिरवत. त्यामुळे इमारतींमधील सर्वच्या सर्व म्हणजे १00 टक्के रहिवाशांनी पुनर्विकासाला विरोध दर्शविला.अखेर म्हाडा, बिल्डर आणि नागरिकांनी ट्रस्टला इमारतीचे बांधकाम सुरू करण्याची अखेरची संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही बिल्डरने काम सुरू न केल्याने म्हाडा अधिकाऱ्यांनी पुनर्विकासासाठी देण्यात आलेली एनओसी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एनओसी देताना घालण्यात आलेल्या अटींचे पालन न केल्याचा ठपकाही या बिल्डरवर ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे म्हाडाच्या सेसप्राप्त इमारतीच्या पुनर्विकासाची परवानगी घेऊन रहिवाशांची फरफट करणाऱ्या बिल्डरांना धक्का बसला आहे. दरम्यान, इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या प्रभारी पदाचा कार्यभार असताना मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे मुख्य अधिकारी पी.डी. मलिकनेर यांनी हा धडाडीचा निर्णय घेतला आहे.
म्हाडाचा बिल्डरला दणका
By admin | Published: August 07, 2015 1:01 AM