Join us

शिंदे गटाकडून निवडणूक आयोगात शपथपत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे पोहोचले, ठाकरे गटाला २१ तासांची शेवटची मुदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2022 5:47 PM

'धनुष्यबाणा'साठीची शिंदे आणि ठाकरे गटातील लढाई आता दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. शिवसेना पक्ष नेमका कुणाचा आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याचा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोग ठरवणार आहे.

मुंबई-

'धनुष्यबाणा'साठीची शिंदे आणि ठाकरे गटातील लढाई आता दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. शिवसेना पक्ष नेमका कुणाचा आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याचा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोग ठरवणार आहे. यासाठी दोन्ही पक्षांना आपली बाजू मांडण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या मुदतीनुसार आज शिंदे गटाकडून शपथपत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे निवडणूक आयोगात सादर करण्यात आले आहेत. शपथपत्रांनी भरलेली एक कार आज दिल्लीतील निवडणूक आयोगामध्ये पोहोचली आणि शिंदे गटाकडून जवळपास ७ लाख सदस्यांची शपथपत्र निवडणूक आयोगाला सुपूर्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

अंधेरी पोटनिवडणूक: धनुष्यबाण चिन्ह फ्रिज झाले तर काय? ठाकरे-शिंदेंकडे प्लॅन बी खरंच आहे?

दुसरीकडे ठाकरे गटाकडून कागदपत्रं सादर करण्यासाठी मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती. पण निवडणूक आयोगानं आता ठाकरे गटाला उद्या दुपारी २ वाजेपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला आता पुढच्या २१ तासांत कागदपत्र निवडणूक आयोगासमोर सादर करावी लागणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला धनुष्याबाणाच्या चिन्हा संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी आपल्यालाच धनुष्यबाण हे चिन्ह मिळावं अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. 

धनुष्यबाण कुणाचा? शिवसेना की शिंदेगटाचा, निवडणूक आयोगातील निर्णय लांबणीवर

आपल्या  बाजूनं 40 आमदार, 12 खासदार, 144 पदाधिकारी, 11 राज्यप्रमुख असल्याचा दावा शिंदे गटानं आयोगासमोर केलेला आहे. सोबतच 1 लाख 66 हजार 764 प्राथमिक सदस्यत्वांची शपथपत्रंही सादर करण्यात आलीत. अर्थात याला तोडीस तोड उत्तर देण्याच्या तयारीत ठाकरे गटही आहे. पक्षाच्या घटनेत प्रतिनिधी सभा सर्वात महत्वाची असते असं सांगत पक्षावरचा दावा ठाकरे गटानं सांगितला आहे. शिवाय 10 लाख प्राथमिक सदस्यांची शपथपत्रंही आयोगाला सादर करण्याच्या तयारीत ठाकरे गट आहे, अशीही माहिती समोर आली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरे