बोर्डी : घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नरपड आणि चिखले गावांत डेंगीचे रुग्ण आढळले आहेत. याबाबत, संबंधित ग्रामपंचायतीसह तालुका आरोग्य विभाग अनभिज्ञ असून कारवाई व उपाययोजनेअभावी रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.पालघर जिल्ह्यातील डहाणू या आदिवासी तालुक्यातील नरपड आणि चिखले गावांत अनुक्रमे पाच व दोन डेंगीचे रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यभरात डेंगीचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने जनजागृती मोहिमेसह सर्व्हेद्वारे लोकांची तपासणी, धूर फवारणी आदी कार्यवाही हाती घेतली आहे. मात्र, संंबंधित गावांतील ग्रामपंचायतींप्रमाणेच तालुका आरोग्य विभाग या प्रकाराबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे डेंगीच्या रुग्णात वाढ होण्याची शक्यता आहे.चिखले गावातील दलित वस्तीची पाणीपुरवठा योजना वर्षभरापासून बंद असून दलित पाण्यापासून वंचित आहेत. परिसरातील दोन विहिरींचे पाणी दूषित असून पाण्याला दुर्गंधी येते. कूपनलिकेनजीक दूषित पाण्याचे डबके तयार झाले आहे. घरात साठलेले पाणीच डेंगीच्या डासांना पोसत असल्याने जनजागृती मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. दुर्दैवाने दलित अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना डेंगीने दलिताचा मृत्यू झाल्यास प्रकरण चिघळण्याची दाट शक्यता आहे.दरम्यान डेंगी, मलेरिया, जलजन्य आजारांविरुद्ध तत्काळ कृती आराखडा आखून कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
बोर्डीत डेंगीची लागण
By admin | Published: November 06, 2014 11:32 PM