डबेवाल्यांनाही पाहिजे निवडणुकीचे तिकीट!
By admin | Published: August 20, 2014 01:39 AM2014-08-20T01:39:43+5:302014-08-20T01:39:43+5:30
मुंबईकरांची पोटापाण्याची गरज भागविणारा मुंबईचा डबेवाला आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
Next
मुंबई : मुंबईकरांची पोटापाण्याची गरज भागविणारा मुंबईचा डबेवाला आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मात्र अपक्ष म्हणून तो निवडणूक लढण्यास इच्छुक नसून, शिवसेनेकडून त्यांना निवडणुकीचे तिकीट मिळावे, अशी त्यांची मनीषा आहे.
मॅनेजमेंट गुरू मुंबईचे डबेवाले 125 वर्षे मुंबईत अविरत काम करत आहेत. ऊन-पावसाची तमा न बाळगता ते मुंबईकरांना वेळेवर डबा पोहोचविण्याचे काम करत आहेत. शिवाय डबेवाल्यांच्या प्रश्नांसह सामाजिक विषयांना घेऊन त्यांनी आंदोलनेही केली आहेत. मात्र त्याचा त्यांना काहीही फायदा झालेला नाही. मुंबईतील गिरणी कामगार आणि माथाडी कामगार यांचे प्रतिनिधी हे राजकारणात सक्रिय झाले. त्यानंतर हे प्रतिनिधी जिथे निर्णय होतात तिथे पोहोचलेत. त्यामुळे त्यांचे प्रश्न सुटण्यास मदत झाली. या कारणास्तव आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला राजकारणात उतरावे लागणार आहे. जिथे निर्णय होतात, तिथे जायचे आहे, असे मुंबई डबेवालाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
मुंबईच्या डबेवाल्याला गिरणगावातून, भायखळा, शिवडी यापैकी एका मतदारसंघातून उमेदवारी पाहिजे आहे. त्यासाठी त्यांनी शिवसेनेला यासंदर्भातील निवेदन दिले आहे. परंतु शिवसेनेकडून अद्याप त्यांनी काहीच प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही. (प्रतिनिधी)